महाराजांचा क्रोध अनावर भक्तगण घेईना मनावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराजांचा क्रोध अनावर
भक्तगण घेईना मनावर
महाराजांचा क्रोध अनावर भक्तगण घेईना मनावर

महाराजांचा क्रोध अनावर भक्तगण घेईना मनावर

sakal_logo
By

‘‘सगळ्या जगाला प्रेमाने जिंकून, क्रोधावर विजय मिळवायला हवा. त्याचप्रमाणे लोभ, मद, मत्सर या विकारांपासूनही आपण दूर राहिले तरच आपण माणूस म्हणून श्रेष्ठ ठरू शकतो. सोनं- नाणं या गोष्टींपासून चार हात लांब राहायला हवं.’’ प्रेमनाथ महाराजांनी भक्तांना उपदेश केला. त्यानंतर त्यांनी हवेत हात फिरवून, सोन्याची अंगठी काढली. हा चमत्कार पाहून, सगळ्या भक्तगणांनी ‘प्रेमनाथ महाराज की जय’ अशा घोषणा द्यायला सुरवात केली.
‘‘मी जे बोलतो, तेच कृतीतून उतरवतो. सोनं- नाणं या गोष्टींपासून मी नेहमीच दूर राहतो.’’ असे म्हणून त्यांनी हवेतून काढलेली अंगठी समोरच्या दानपेटीत टाकली.
‘‘आपल्याकडील धनदौलत दान केल्याने वाढत असते. त्यामुळे तुम्हीही दानधर्म करा.’’ अशी सूचना त्यांनी भक्तांना केली. त्यानंतर अनेकजण महाराजांचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहिले. काहींनी महाराजांच्या पायाजवळ नोटा ठेवल्या.
‘‘अज्ञान बालकांनो, मी पैशाला स्पर्शही करत नाही. उचला ते पैसे आणि समोरच्या दानपेटीत टाका.’’ प्रेमनाथ महाराजांनी भक्तांना प्रेमाने सुनावले. तेवढ्यात एकजण रांग तोडून पुढे येत होता. त्याच्यावर सगळेजण धावून गेले. महाराजांनी त्यांना रोखले.
‘‘माझ्या आश्रमात शांततेला फार महत्त्व आहे. हे जग आपल्याला प्रेमाने जिंकायचे आहे. त्यामुळे कोणीही क्रोधित होऊ नका. त्या माणसाला माफ करून, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करा. ’’ महाराजांनी रागावलेल्या भक्तांना आदेश दिला. त्यानंतर रामराव हे महाराजांजवळ आले. त्याने दहा रुपयांची नोट महाराजांच्या पायाजवळ ठेवली.
‘‘महाराज, माझे लग्न जुळत नाही. काहीतरी तोडगा सांगा.’’ रामरावने म्हटले. मात्र, दहा रुपयांची नोट बघूनच महाराजांच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली.
‘‘मी पैशांना हात लावत नाही.’’ महाराजांनी असं म्हटल्यावर रामरावने ती नोट दानपेटीत टाकली.
‘‘महाराज, तुमचं नाव काय आहे?’’ रामरावने विचारले.
‘‘मला प्रेमनाथमहाराज म्हणतात. सगळ्या जगाला मी प्रेमानं जिंकतो म्हणून माझं हे नाव आहे.’’ त्यावर रामरावने कानामागे हात नेत म्हटले.
‘‘महाराज, मला कमी ऐकू येतं. काय म्हणालात?’’ रामरावने म्हटले. त्यावर महाराजांनी पुन्हा नाव सांगितले.
‘‘गेमनाथमहाराज? असलं कसलं तुमचं नाव आहे? तुम्ही काय कोणाची गेम केलीत का?’’ रामरावने विचारले.
‘‘अरे मूर्खा, माझं नाव प्रेमनाथमहाराज आहे. सगळीकडे होर्डिंग्ज आणि फ्लेक्स लागलेत, ते वाचता येत नाही का? एवढे हजारो लोक माझ्या दर्शनासाठी खोळंबलेत, ते काय वेडे आहेत का? मलाच माझे नाव विचारण्यापेक्षा त्यातील एखाद्याला तुला विचारता येत नाही का?’’ महाराजांनी आवाज चढवून विचारले. रागाने ते नुसते थरथरत होते.
‘‘मेणनाथमहाराज? तुम्ही काय मेणापासून बनले आहात का?’’ रामरावने कानात करंगळी घालत विचारले.
आता मात्र महाराजांचा राग अनावर झाला होता. त्यांचे डोळे लालबुंद झाले होते.
मूर्ख माणसा, माझी कीर्ती साऱ्या देशातच काय पण परदेशात पसरली आहे. सगळ्या जगाला मी प्रेमाने जिंकतो म्हणून भक्तांनी माझं नाव प्रेमनाथ ठेवलंय आणि
शंभरवेळा सांगूनही तुझ्या लक्षात कसे येत नाही?’’ महाराजांचा आवाज टिपेला पोचला होता. त्यांचा रुद्रावतार बघून, सगळे भक्तगणही भीतीने घाबरले होते.
‘‘बरं चेननाथ तर चेननाथ. तुम्ही गळ्यात सोन्याची चेन घालता म्हणून हे नाव ठेवलंय ना? बरं ते जाऊ द्या. माझे लग्न का जुळत नाही, त्यावरील तोडगा सांगून मला मोकळं करा.’’ रामरावने म्हटले.
‘‘गाढवाऽऽऽ, माझं लग्न जुळलं असतं तर मी कशाला महाराज बनलो असतो. जिथं मला माझं लग्न जुळवता आलं नाही, तिथं तुझं काय लग्न जुळवून देणार?
तू आताच्या आता आश्रमाच्या बाहेर हो. मला राग येईल, असे वागू नको.’’ असे म्हणून महाराजांनी रामरावच्या दिशेने वीट फेकून मारली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94321 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..