संकटांना चकवा देत लढणाऱ्या विक्रमचा ''विक्रम'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संकटांना चकवा देत लढणाऱ्या विक्रमचा ''विक्रम''
संकटांना चकवा देत लढणाऱ्या विक्रमचा ''विक्रम''

संकटांना चकवा देत लढणाऱ्या विक्रमचा ''विक्रम''

sakal_logo
By

संकटांना चकवा देत लढणाऱ्या विक्रमचा ‘विक्रम’
-छाया काविरे

संघर्षाला चकवा देत यशाच्या पायऱ्या चढत निघालेल्या विक्रम मालन आप्पासो शिंदे (वय २७, रा. गोखलेनगर, मूळ रा. वेळू, ता. कोरेगाव, जि. सातारा) याची ही प्रेरणादायी कहाणी. उच्च शिक्षणाचे ध्येय आणि डोळ्यात नव्या स्वप्नांची चमक घेऊन विक्रम ७ वर्षांपूर्वी साताऱ्याहून पुण्यात आला. घरच्या गरिबीमुळे पूर्णवेळ शिक्षण करणे त्याला शक्य नव्हते. मग पोटाची खळगी भरता यावी आणि आपले पुढे शिक्षणही सुरू राहावे यासाठी रात्री वॉचमनचे काम अन् दिवसा शिक्षण असा दिनक्रम सुरू झाला. सेनापती बापट रोडवरील ज्या सिंबॉयसिस शैक्षणिक इमारतीची रात्र-रात्र सुरक्षा केली त्याच संस्थेत आज त्याने पीएचडीला प्रवेश मिळवला.

गावाला एक एकर शेती अन् ती ही कोरडवाहू. आई वडिलांनी मजुरी करून घराचा गाडा चालवला होता. अशा वेळी कमवा व शिका योजनेतून त्याने यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा येथे बीएस्सी फिजिक्सचे शिक्षण पूर्ण केले. बऱ्याचदा प्रॅक्टिकल सुरू होण्याआधी तो त्याच्या रफ बुकमध्ये कविता लिहीत बसलेला असायचा. विक्रम महाविद्यालयीन जीवनापासून वक्तृत्व स्पर्धा व कविता करायचा. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खूप चांगली नसली तरी परिस्थितीचे भांडवल न करता टप्प्या-टप्याने यशाला गवसणी देत तो लढत राहिला.

पदवीनंतर अवघ्या २१व्या वर्षी त्याने स्वतःचा पहिला काव्यसंग्रह ‘श्वास ओला’ प्रकाशित केला. त्यानंतर पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजमध्ये वकिलीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पुण्यात पहिल्यांदाच आलेला विक्रम काही काळ शहरी वातावरणात कावराबावराही झाला. न्यूनगंडाच्या आणि नक्की काय करायचंय? या द्विधा मनःस्थितीत असलेल्या विक्रमला काही अडचणींमुळे कायद्याचे शिक्षण अर्ध्यातूनच सोडावे लागले. या काळात कुटुंबाची आर्थिक जबाबदारी स्वीकारून त्याने नाईट वॉचमन म्हणून काम करायला सुरवात केली. पुण्याच्या लॅविश एरियातील सिंबॉयसिस कॉलेजच्या गेटवर सुरक्षारक्षक म्हणून काम करण्याचा त्याचा प्रवास २०१६ साली सुरू झाला.

रात्री हे काम करायचे आणि दिवसा स्वतः चा छंद जोपासायचा हा त्याचा नित्यनेम. बऱ्याचदा लग्नसमारंभ किंवा मंगलकार्यात केटरिंग सर्व्हिस द्यायलाही तो जात असे. वेळ मिळेल तसे सामाजिक चळवळींमध्ये झोकून काम करण्याची आवडही त्याला होती. समोर कशीही वेळ आली तरी आपण त्या वेळेला सामोरे जायचे, असा त्याचा व्रणच असायचा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित ‘संविधान जागर’ यात्रेने विक्रमच्या आयुष्याला कलाटणी दिली. चळवळीमुळे त्याचे सामाजिक भान विस्तारत गेले. पुढे जाणीव जागृती फाउंडेशनच्या माध्यमातून तो काम करत राहिला. शिक्षण, रोजगार या विषयांवर काम करता करता ‘अस्वस्थ’ हा दुसरा काव्यसंग्रह त्याने पूर्ण केला. दरम्यान श्रीपाल सबनीस यांच्याशी त्याची ओळख झाली. आपल्या कविता त्यांना दाखवून, तपासून घेऊन तो साहित्य क्षेत्रात स्वतःची नवी ओळख बनवू लागला. घरगुती अडचणी या काळातही कमी नव्हत्याच. पण, तो लढत राहिला. या नंतर समाजबंध नावाच्या उपक्रमाला त्याने स्वतःला जोडून घेतले. स्त्रियांच्या मासिक पाळीसंदर्भात आणि सॅनिटरी पॅडबाबत जनजागृती करणाऱ्या मोहिमेत तो अग्रस्थानी राहिला. हे सगळे करताना नाईट वॉचमन म्हणून त्याची नोकरी सुरूच होती.

सामाजिक चळवळींमध्ये काम केल्यानंतर विक्रमला एमएसड्ब्लयू करण्याची इच्छा झाली. आपण करत असलेल्या कामाला रचनात्मक स्वरूप द्यायचे म्हटले तर योग्य शिक्षण घेणे गरजेचे असल्याचे मनाशी ठरवून विक्रमने एमएसड्ब्लयू पूर्ण केले. उस्मानाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्याने त्याच्या काही कविता सादर केल्या. लॉकडाऊन काळात सारे जग घरी असताना विक्रम मात्र आपले घर व्यवस्थित चालावे म्हणून धोका पत्करून पुण्यात राहत होता. २०२०चा ई दिवाळी अंक ‘अक्षरदीप’ त्याने स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केला आणि एक चांगला संपादक म्हणून सुद्धा साहित्यात योगदान द्यायला सुरवात केली. पुढे फेब्रुवारी २०२१ मध्ये तो ‘सेट’ परीक्षाही उत्तीर्ण झाला आणि आता तर थेट पीएचडीसाठीच त्याने प्रवेश मिळविला आहे. गावी शेतात रमणारा, मोकळ्या वेळेत कविता लिहिणारा आणि कामाच्या वेळेत कामाकडे पूर्ण लक्ष देणारा विक्रम. साहित्यासोबत प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करत त्याचे लढत जगणे तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे.
......................

रात्री कित्येक वेळा पावसात छत्री घेऊन संस्थेच्या प्रवेशद्वारावर उभे राहून राखण केली. केवळ 4 तास झोप घेऊन दिवसभर शिक्षण घेत असे. ज्या ठिकाणी वाचमनची नोकरी केली तेथून उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न होते जे आज पूर्ण झाले आहे. असंघटित कामगारांचे खूपच गंभीर प्रश्न आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी पुढे संशोधन करायचे आहे. रचनात्मक पातळीवर यासाठी थोडेफार योगदान देता यावे यासाठीच ही धडपड चालली आहे
- विक्रम मालन आप्पासो शिंदे, संशोधक
.........................

पुणे : सिम्बॉयसिसच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लायब्ररीत सुरक्षा रक्षकाचे काम करताना विक्रम शिंदे.
PNE22S87361

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94420 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..