गणरायाच्या आगमनासाठी उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणरायाच्या आगमनासाठी उत्साह
गणरायाच्या आगमनासाठी उत्साह

गणरायाच्या आगमनासाठी उत्साह

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० : आगमनाला ३० दिवस बाकी, २० दिवस बाकी, ५ दिवस बाकी अशाप्रकारे दिवस, तास मोजणाऱ्या गणेश भक्तांची प्रतीक्षा संपण्यास काही तासांचा अवधी उरला आहे. बाप्पाच्या आगमनासाठी उद्योगनगरी सज्ज झाली असून उत्साहाला उधाण आले आहे.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच उद्या (बुधवार) घरोघरी व शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत प्रतिष्ठापना होणार आहे. अनेकांनी आदल्या दिवशीच म्हणजेच मंगळवारी बाप्पांना वाजतगाजत घरी आणले. सकाळी लवकरच प्रतिष्ठापना करायची असल्याने अनेकजण सहकुटुंब मूर्ती आणण्यासाठी येत असल्याचे दिसून आले. सर्वत्र भक्तिमय वातावरण असून गणेशाची गाणी कानावर पडू लागली आहेत. पूजा, सजावट यासह बाप्पांना दररोज कोणता नैवेद्य असावा, याचेही नियोजन केले जात आहे. आवडता मोदक असला तरी इतरही गोडधोड पदार्थ बनविण्याचे नियोजन गृहिणींनी अगोदरच केले आहे.

प्रतीक्षा संपली
बाप्पांच्या आगमनाची भक्तांना इतकी आतुरता असते की, अक्षरश दिवस अन तसाही मोजले जातात. यंदा कोणत्या महिन्यात, कोणत्या तारखेला, किती दिवसांचा उत्सव असेल, याची माहिती जानेवारी महिन्यात दिनदर्शिका येताच जाणून घेतली जाते.बापाच्या आगमनाबाबत असलेल्या आतुरतेचे वेगवेगळे व्हिडिओही सोशलमिडीयावर सहा महिने अगोदरपासूनच पहायला मिळत आहेत.
---
अशी करा पूजेची तयारी
मूर्ती, श्रीफळ, कापड, कापसाची माळा, हार, सुट्टी फुले व नाणी, अत्तर, गूळ-खोबरे, सुपारी, देठाची पाने, गोडपदार्थ, मोदक, कापसाचे वस्त्र, अगरबत्ती, कापूर, दूर्वा, हळदी, कुंकू, गुलाल, दिवा, तेल, समई, वाती, फळे, पंचामृत, नैवेद्य, पळी, पंचपात्र, जानवे, केवड्याची पाने, आंब्याची पाने, ताम्हण, कलश, शंख, घंटा, अक्षता आदी साहित्य घ्यावे.
----
बाजारपेठेत गर्दी; वाहतूक मंदावली
मूर्तीसह पूजेचे व सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. सकाळी लवकर प्रतिष्ठापना करायची असल्याने अनेकांनी आदल्या दिवशीच खरेदीला प्राधान्य दिले. चिंचवडगाव, पिंपरी कॅम्प, देहूरोड, भोसरी, आकुर्डीगाव, मोशी, चिखली, सांगवी, दापोडी, वाकड,काळेवाडी, रहाटणी, देहू येथील बाजारपेठेत मंगळवारी मोठी गर्दी होती. त्यामुळे बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर सायंकाळी वाहतूककोंडी झाल्याने परिसरातील वाहतूक मंदावली होती.
----
पूर्वसंध्येलाच आगमन
सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत प्रतिष्ठापनेसाठी चांगला मुहूर्त असल्याने अनेकांनी बुधवारी सकाळी लवकरच बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याचे नियोजन केले. त्यामुळे मंगळवारी आदल्या दिवशीच बाप्पांना घरी आणले.
----
देखाव्यांवर अंतिम हात
शहरातील विविध सार्वजनिक मंडळात भव्य देखावे साकारले जात आहेत. बुधवार किंवा गुरूवारपासून देखावे सादरीकरणाला सुरुवात होणार असल्याने या देखाव्यांवर अंतिम हात फिरविला जात आहे. तसेच जिवंत देखाव्यातील कलाकारांचीही जोरदार सराव सुरु आहे. ढोलताशांच्या गजरात, ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आगमन मिरवणूक काढण्याचेही नियोजनही मंडळांनी केले आहे.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95335 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..