किमान समान कार्यक्रमावर करणार काम संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीच्या घोषणेचे दोन्ही पक्षातून स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किमान समान कार्यक्रमावर करणार काम
संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीच्या घोषणेचे दोन्ही पक्षातून स्वागत
किमान समान कार्यक्रमावर करणार काम संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीच्या घोषणेचे दोन्ही पक्षातून स्वागत

किमान समान कार्यक्रमावर करणार काम संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीच्या घोषणेचे दोन्ही पक्षातून स्वागत

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३१ : एकीकडे राज्यात शिवसेनेला खिंडार पडलेले असतानाच शिवसेना व संभाजी ब्रिगेड हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्याचा दोन्ही पक्षांना फायदा होईल, अशी प्रतिक्रिया दोन्ही पक्षात उमटली आहे. त्यामुळे या युतीचे पिंपरी-चिंचवड शहरातून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागतच केले आहे.
राज्यात शिवसेना व संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा नुकतीच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड, मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी केली. त्यांनतर पिंपरी-चिंचवड शहरातही या युतीचे दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. राज्यातील महाआघाडी सरकारच्या स्थापनेनंतर शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षांचा मित्रपक्ष भाजप पूर्णपणे बाजूला गेला होता. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपशी युती करून राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेने संभाजी ब्रिगेडबरोबर युती केल्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय होता.

महाराष्ट्राच्या राजकारणात संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीची घोषणा करण्यात आली. याचा संभाजी ब्रिगेडचा शहराध्यक्ष म्हणून मनस्वी आनंद झाला आहे. येणाऱ्या काळात शहरामध्ये शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करू व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीत संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू व आमचे नेते पुरुषोत्तम खेडेकर व प्रबोधनकार केशव ठाकरे यांना अभिप्रेत असणारे समाजकारण व राजकारण आम्ही करणार आहोत.
- प्रवीण कदम, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.

हिंदुत्ववादी शिवसेना व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना मानणारा व त्यांच्या मुलाच्या नावाने असणाऱ्या संभाजी ब्रिगेड पक्षाची युती झाली, ही निश्‍चितच आनंदाची व स्वागताची बाब आहे. राज्यात व पिंपरी-चिंचवड शहरात आगामी नि वडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांचा एकमेकांना फायदा होईल. संभाजी ब्रिगेड ही पुरोगामी विचारांची पक्ष, संघटना आहे. शिवसेनेलाही प्रबोधनकार ठाकरे यांचा पुरोगामी विचारांचा वारसा आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष चांगले काम करतील.
- सुलभा उबाळे, जिल्हा संघटिका, शिवसेना महिला आघाडी.

देशात ज्या पद्धतीने भाजप प्रादेशिक पक्षांना संपवू पाहात आहे. ही निश्‍चितच लोकशाहीला साजेशी बाब नाही. हा देश सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारा असताना देशात एकाधिकारशाही राबवून हुकूमशाही आणण्याचे कारस्थान भाजपकडून सुरु आहे. याला वेळीच आवर घालण्यासाठी राज्यातील व देशातील प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठीच संभाजी ब्रिगेडने शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्व निवडणुका शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.
- अभिमन्यू पवार, प्रदेश उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.

शिवसेना व संभाजी ब्रिगेड युती झाली, हा निश्‍चितच योग्य निर्णय झालेला आहे. राज्यात व शहरात दोन्ही पक्ष ताकदीने काम करतील. शिवसेनेला पुन्हा गत वैभव प्राप्त होणार आहे. किमान-समान कार्यक्रमावर दोन्ही पक्ष एकत्र आले असून, आगामी निवडणुकांमध्ये दोघांनाही याचा फायदा होईल.
- गुलाब गरुड, झोपडपट्टी सेना, माजी हवेली तालुका प्रमुख.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95387 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..