लहान मुलांनाही द्या खोटं बोलायचं प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लहान मुलांनाही द्या
खोटं बोलायचं प्रशिक्षण
लहान मुलांनाही द्या खोटं बोलायचं प्रशिक्षण

लहान मुलांनाही द्या खोटं बोलायचं प्रशिक्षण

sakal_logo
By

‘‘बाळा, मी तुझ्याएवढा होतो. त्यावेळी तीसपर्यंतचे पाढे पाठ होते. मुळाक्षरे तर एका दमात म्हणून दाखवायचो. वर्गात नेहमी मी पहिला यायचो. दिवस- रात्र अभ्यास केला म्हणून शिपाई म्हणून नोकरी लागली. कंपनीतील माझा रुबाब पाहिल्यावर तू तोंडात बोट घालशील. बरं ते जाऊ दे, तू दहाचा पाढा म्हणून दाखव....‘एबीसीडी’ म्हणून दाखव..., अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत, सांग बघू? मराठी महिने, इंग्रजी महिने झटाझट म्हणून दाखवा, एक साडी वाळायला अर्धा तास लागत असेल तर पाच साड्या वाळायला किती वेळ लागेल?’’ चौगुलेकाकांनी पहिलीतील उन्मेष व तिसरीतील प्रांजलीवर प्रश्‍नांचा भडिमार केला. त्यामुळे चौगुलेकाका घरी आल्यावर दोघांच्या डोक्यात तिडीक जायची पण बाबांचे मित्र असल्याने दोघांना काय बोलता यायचे नाही.
‘‘माझ्याकडे दहा पेरू आहेत. त्यातील एक- एक पेरू मी तुमच्या दोघांना दिला तर माझ्याकडे किती पेरू उरतील?’’ चौगुलेकाकांनी प्रश्‍न विचारला.
‘‘तुमच्याकडे दहा पेरू राहतील.’’ उन्मेषने उत्तर दिले.
‘‘कसं काय?’’ चौगुलेकाकांनी विचारले.
‘‘अहो काका, तुम्ही कधी आम्हाला तुमच्याजवळचा खाऊ दिला आहे का? पेरूसुद्धा तुम्ही आम्हाला देणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे तुमच्याकडे दहाच पेरू राहतील.’’ उन्मेषने म्हटले. त्यावर चौगुलेकाका गडबडले.
‘‘अरे मी नेहमी तुम्हाला खाऊ आणतो पण तुमचा अभ्यास घेण्याच्या नादात तुम्हाला द्यायचंच विसरून जातो.’’ चौगुलेकाकांनी खुलासा केला. त्यानंतर त्यांनी खिशातून दोन लिमलेटच्या गोळ्या काढल्या व दोघांच्या हातावर ठेवल्या व म्हणाले,‘‘ऐश करा. नाहीतर परत म्हणाल, काका कधीच आम्हाला खाऊ देत नाहीत.’’ तेवढ्यात उन्मेषच्या आईने जेवण तयार झाल्याचं सांगितलं. चौगुलेकाकांनी हात- पाय धुतले.
काका व बाबा जेवायला बसल्याचे पाहून उन्मेष व प्रांजलीने दप्तर आवरले.
‘‘उन्मेष, कांदा आण रे.’’ चौगुलेकाकांनी असे म्हटल्यावर उन्मेषने कांदा आणून दिला.
‘‘आपल्या राज्यात सर्वाधिक कांदा कोठे पिकतो, माहीत आहे का?’’ काकांनी विचारले.
‘‘काका, कांदा कसे पिकेल? पिकायला तो काय आंबा आहे का?’’ असे म्हणून हसतच उन्मेष बेडरूममध्ये गेला.
‘‘सुहास, मुलांकडे नीट लक्ष दे रे. अभ्यासात फार कच्ची आहेत. तरी बरं मी त्यांचा अभ्यास घेतो म्हणून परिस्थिती बरी आहे. आमच्या लहानपणी मी किती हुशार होतो. शंभरपर्यंतचे पाढे पाठ होते......सनावळ्या तर आख्ख्या पाठ होत्या. नाहीतर आताची मुले. आपल्या देशाला कधी स्वातंत्र्य मिळाले, हे त्यांना माहिती नसतं.....’’ चौगुलेकाकांची टकळी चालू झाली. जेवण झाल्यानंतर चौगुलेकाका घरी जायला निघाले.
‘‘सुहास, पाचशे रूपये दे रे. पगार झाल्यावर परत करतो.’’ काकांनी म्हटल्यावर उन्मेषच्या बाबांनी त्यांना पैसे दिले. त्यानंतर ते घरी गेले. त्यानंतर बरेच दिवस ते घरी न आल्याने उन्मेष व प्रांजलीला मोकळं वाटत होतं. मात्र, एकदा सायंकाळी पाचला बेल वाजल्याने उन्मेषने दार उघडले.
‘‘उन्मेष, कोण आलं आहे रे?’’ आईने किचनमधून विचारले.
‘‘अगं काका आले आहेत.’’ उन्मेषने उत्तर दिले.
‘‘काका? कोणते काका?’’ आईने विचारले.
‘‘अगं ‘बोअर काका’ गं. आमच्या डोक्याची विनाकारण मंडई करून, स्वतःची टिमकी वाजवणारे काका. तू बाबांना म्हणतेस ना? तुमचा हा मित्र जेवणाच्यावेळी नेहमी कसा काय टपकतो. बरं जेवायला बसल्यावर दुष्काळातून आल्यासारखं तुटून पडतात. बरं जेवताना तोंडाने ‘मचमच’ असा आवाज करतात आणि जाताना उसने म्हणून पैसे नेतात आणि बुडवतात, ते काका गं.’’ उन्मेषने आपला असा परिचय करून दिल्यावर चौगुलेकाकांनी तेथून पळ काढला. सध्या उन्मेषला त्याची आई पाहुण्यांसमोर खोटं कसं बोलावं, याचं प्रशिक्षण देत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96788 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..