शहरात घुमला एकतेचा नारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात घुमला एकतेचा नारा
शहरात घुमला एकतेचा नारा

शहरात घुमला एकतेचा नारा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ ः जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी आम्ही काम करू. आमच्यातील वैयक्तिक किंवा सामूहिक सर्व प्रकारचे मतभेद आम्ही हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून संविधानिक मार्गानी सोडवू, अशी प्रतिज्ञा घेतली. निमित्त होते महापालिकेतर्फे सद्भावना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. या माध्यमातून शहरात सामाजिक एकतेचा नारा घुमला.
केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या सूचनेनुसार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती दिवस अर्थात सद्भावना दिवसानिमित्त आणि राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे आयोजित सामाजिक ऐक्य पंधरवडा उपक्रमाचा समारोप चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झाला. हिंदु धर्मजागरण संस्थेचे संयोजक माधव खोत, मौलाना कारी अब्दुल इकबाल, बौद्ध भंते धम्मानंदजी आणि शिख धर्मगुरू भाई दर्शनसिंग यांच्यासह उपआयुक्त संदीप खोत, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते. प्रफुल्ल पुराणिक यांनी प्रतिज्ञेचे वाचन केले. ‘मानवी मूल्ये सर्वात श्रेष्ठ असून त्याची जपणूक करण्यासाठी आपसात सद्भावना निर्माण करणे गरजेचे आहे. त्यातून सक्षम, सुदृढ आणि एकसंघ राष्ट्राची निर्मिती होते. भारताला बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येकाने सद्भावना वृद्धिंगत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे,’ असा सूर कार्यक्रमात उमटला.

धर्मगुरू, मौलाना म्हणाले...
सर्वधर्म समाज टिकण्यासाठी सर्वधर्मीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपापसात संवाद राखणे महत्त्वाचे आहे. दोन धर्मांत गैरसमजातून वाद निर्माण होतो. तो टाळण्यासाठी देश डोळ्यासमोर ठेवून परस्परांशी समन्वय राखल्यास भारत वैभवशाली व समृद्ध होईल.
- माधव खोत, संयोजक, हिंदु धर्मजागरण संस्था

नागरिकांमधील कलह कमी करण्यासाठी परस्परांप्रती सद्भावना राखणे गरजेचे आहे. प्रत्येकाने सर्वांशी माणुसकीने वागले पाहिजे. माणसांतील द्वेष, वैरभाव दूर करून माणसाने माणसांशी विनम्रतेने वागावे. संविधांनातील आधारभूत मानवी मूल्ये प्रत्येकाने जपावीत.
- भंते धम्मानंदजी, बौद्ध धम्म

सर्वांचे कल्याण व्हावे. सर्वजण सुखी, समाधानी व सुरक्षित राहावेत, अशी शिकवण गुरुनानक यांनी दिली आहे. या शिकवणुकीच्या आधारे सर्वांनी परस्परांबद्दल आदराची भावना जोपासली पाहिजे. त्यासाठी एकमेकांप्रती, एकमेकांच्या धर्माप्रती आदर राखला पाहिजे.
- भाई दर्शनसिंग, शिख धर्मगुरू

परदेशी गेल्यानंतर आपली ओळख धर्मानुसार नाही, तर भारतीय अशीच होते. मानवता हीच सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांनी इतरांप्रती माणुसकी जपली पाहिजे. दिवाळी, ईद सारख्या सणांतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जातो. अशा विविधतेने नटलेल्या देशाचा अभिमान आहे.
- कारी अब्दुल इकबाल, मौलाना

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97404 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..