स्व्पनात जे पाहिले, त्यावरून झाप झापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्व्पनात जे पाहिले, त्यावरून झाप झापले
स्व्पनात जे पाहिले, त्यावरून झाप झापले

स्व्पनात जे पाहिले, त्यावरून झाप झापले

sakal_logo
By

संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर वातावरण गरम पाहून, श्रीधरला घाम फुटला.
‘‘काय झालं? मोबाईलचा नेट पॅक तर संपला नाही ना? की तुझ्या आईशी फोनवरून तासभर संवाद झाला नाही? की
शेजारणीने नवीन साडी घेतली?’’ श्रीधरने स्वातीला विचारले. त्यावर काहीही उत्तर न देता तिने चिंटूच्या पाठीत धपाटा घातला.
‘‘अगं, तुझा चेहरा असा निस्तेज का दिसतोय? बहुतेक रक्तातील शॉपिंग कमी झालं असावं. चल आपण शॉपिंगला जाऊ?’’ श्रीधरने म्हटले. मात्र, यावरही ती शांत बसली. टेबलवर थंड चहा जोरात आदळला. आता मात्र प्रकरण गंभीर आहे, याची श्रीधरला कल्पना आली. तरीही त्याने थंड चहा गरम आहे, असे समजून ‘फुर्रऽऽफुर्रऽऽऽ’ करीत प्याला.
‘‘अगं आज आमच्या आॅफिसमध्ये मोठी गंमतच झाली....’’ अशी त्याने प्रस्तावना केली. हेतू हा की ‘काय झालं हो’ असं म्हणून ती बोलेल व गाडी रूळावर येईल पण त्या गंमतीच्या प्रस्तावनेवर
‘‘नुसत्या गमती- जमतीच करा. बायको संसारासाठी राब- राबतेय, हे विसरा.’’ असं ती पुटपुटली. बायको बोलत नाही, ही आगामी चक्रीवादळाची सूचना असते, हे इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर त्याला माहिती होते.
‘‘सॉरी ! एकदम सॉरी’’ त्याने कारण नसतानाही माफी मागून तिची समजूत काढायचा प्रयत्न केला. पण तिकडून प्रतिसाद न आल्याने, श्रीधरचं टेंशन आणखी वाढलं.
‘‘अगं दारासमोरील रांगोळी तू काय सुंदर काढली आहेस. तुझ्या हातात एवढी कला आहे, हे मला माहिती नव्हतं.’’ श्रीधरने तिला खुश करण्याचा प्रयत्न केला. त्यावर मात्र ती उखडली.
‘‘मी आतापर्यंत हजारवेळा रांगोळी काढली असेल पण तुम्ही कधी कौतुक केलं नाही. पण आजची रांगोळी शेजारच्या प्राचीवहिनींनी काढली तर लगेचच लागले कौतुक करायला. माझं नशीबच फुटकं आहे.’’ असं म्हणून ती फुरगुंटून बसली. यावर मात्र श्रीधरने आवंढा गिळला. ‘‘अगं मला खरंच माहिती नव्हतं, ती रांगोळी तू काढली नाहीस म्हणून. पुन्हा सॉरी.’’ श्रीधरने सपशेल शरणागती पत्करली.
‘‘तुमचं माझ्याकडे किती लक्ष असतं, यावरूनच दिसतंय. इतक्या वर्षांत माझी रांगोळी काढायची पद्धतही तुम्हाला माहिती नसावी,
याच्यासारखं माझं दुर्दैव ते काय.’’ स्वातीने रूद्रावतार धारण केला.
‘‘पण तू आल्यापासून गप्प का आहेस, ते तरी सांग.’’ श्रीधरने म्हटले.
‘‘मी का रूसलेय, हे एवढ्या वेळानंतरही तुमच्या लक्षात आलं नसेल तर बोलणंच खुंटलं.’’ स्वातीने पवित्रा बोलला.
‘‘कितीवेळ तू कोड्यात बोलणार आहेस?’’ श्रीधरने चिडून विचारले.
‘‘गणपती बघायला मला न्या, असं तुम्हाला मी कितीवेळा सांगितलं असेल पण तुम्ही नेलंत का? नुसती टाळाटाळ करताय.’’ स्वातीने
असं म्हटल्यावर श्रीधरच्या जीवात जीव आला.
‘‘अगं एवढंच ना? ’’ श्रीधरने म्हटले.
‘‘एवढंच नाही. तुम्ही मला गणपती बघायला नेण्यासाठी टाळाटाळ करताय आणि तिकडे आपल्या शेजारणीला प्राचीवहिनींचा हातात हात घेऊन गणपती दाखवत आख्खं पुणे हुंदाडताय.’’ स्वातीने असं म्हटल्यावर श्रीधरला घाम फुटला.
‘‘अगं कधी? वाट्टेल ते काय बोलतेस?’’ श्रीधरने घाबरत म्हटले.
‘‘माझ्या स्वप्नात मी तुमच्या दोघांना हातात हात घालून हिंडताना पाहिलंय.’’ स्वातीने म्हटलं.
‘‘अगं ते स्वप्नं होतं.’’ श्रीधरने म्हटले.
‘‘तुम्ही माझ्या स्वप्नात असं वागत असाल तर तुम्ही तुमच्या स्वप्नात काय करत असाल? त्यातच तुम्ही प्राचीवहिनींनी काढलेल्या
रांगोळीचं तोंडभरून कौतुक केल्यानं माझा संशय आणखी वाढला.’’ प्राचीने असं म्हटल्यावर श्रीधरने नवीन कपडे घालत म्हटले,
‘‘चल आपण तातडीने गणपती बघायला जाऊ. रात्रीचं जेवणही हॉटेलमध्येच करू. नाहीतर परत तुला काही स्वप्नं पडायचं आणि माझ्या डोक्याला ताप व्हायचा.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97780 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..