खरेदी विक्रीद्वारे मालमत्ता हस्तांतर शुल्क वाढीचा फेरविचार करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरेदी विक्रीद्वारे मालमत्ता हस्तांतर शुल्क वाढीचा फेरविचार करावा
खरेदी विक्रीद्वारे मालमत्ता हस्तांतर शुल्क वाढीचा फेरविचार करावा

खरेदी विक्रीद्वारे मालमत्ता हस्तांतर शुल्क वाढीचा फेरविचार करावा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ : खरेदी विक्रीद्वारे मालमत्ता हस्तांतर शुल्कात पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुमारे वीस पट वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अर्थिक भुर्दंड पडत आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा व पूर्वीप्रमाणे करयोग्य मुल्याच्या पाच टक्के प्रमाणे आकारणी करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी गटनेते व माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या करसंकलन कार्यालयातून ३१ मार्च २०२२ नंतरच्या मालमत्ता हस्तांतर शुल्क खरेदी विक्री व्यवहारांचे अर्धा टक्का केल्याने शहरातील नागरिकांवरती मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड पडत आहे. तरी या निर्णयाचा फेरविचार करून शहरातील नागरिकांना पूर्वीप्रमाणे करयोग्य मूल्याच्या पाच टक्क्याने प्रमाणे आकारणी करून दिलासा देण्यात यावा. पूर्वी खरेदी विक्री द्वारे मालमत्ता हस्तांतरण करताना सुमारे २००० रुपयेपर्यंत भरावा लागत होता. परंतु ३१ मार्च २०२२ नंतर ही रक्कम जवळजवळ वीस पटींनी वाढल्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा, असे कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे. काही नागरिकांनी ३१ मार्च पुर्वी व्यवहार करून देखील त्यांना फक्त आपल्याकडे अर्ज नाही केला म्हणून अर्धा टक्का रक्कम भरावी लागत आहे.

‘‘कोरोना काळ तसेच ज्येष्ठ नागरिक व त्यांची मुले परदेशात असल्यामुळे त्यांच्याकडून नजर चुकीने जाहीर प्रकटनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे अर्धा टक्के हस्तांतर मूल्य तुर्तास ३१ मार्च २०२२ पूर्वी हस्तांतरित केलेल्या लोकांना पूर्वीप्रमाणे आकारण्यात यावे. जेणेकरून काही प्रमाणात शहरातील नागरिकाला दिलासा मिळेल. ही अन्यायकारक कर वाढ देखील लवकरात लवकर रद्द करण्यात यावी.’’
- राहुल कलाटे, माजी गटनेते, शिवसेना