तज्ज्ञांच्या सहभागासाठी ‘यूजीसी’चा पुढाकार ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ पदासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तज्ज्ञांच्या सहभागासाठी ‘यूजीसी’चा पुढाकार
‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ पदासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर
तज्ज्ञांच्या सहभागासाठी ‘यूजीसी’चा पुढाकार ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ पदासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर

तज्ज्ञांच्या सहभागासाठी ‘यूजीसी’चा पुढाकार ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ पदासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर

sakal_logo
By

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १ : नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणात देण्यात येणाऱ्या सामान्य शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देत उद्योग-शिक्षण संस्थांमधील नातं अधिक घट्ट व वृद्धिंगत करण्यासाठी पावलं उचलली आहेत. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) उद्योग आणि विविध व्यावसायिक क्षेत्रातील तज्ज्ञांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ हे नवीन पद श्रेणी तयार केली आहे.
आपल्या अनुभवाच्या जोरावर विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या या प्राध्यापकांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकविण्यासाठी आवश्यक अशा शैक्षणिक पात्रता अनिवार्य असणार नाहीत. त्यांना प्रायोजकत्व (कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप) किंवा मानधन स्वरूपात वेतन देण्यात येईल. उच्च शिक्षण संस्थांमध्ये ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून प्राध्यापक असावे, यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना नुकत्याच जाहीर केल्या आहेत. अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, संरक्षण दल, उद्योजक, सनदी लेखापाल, सेंद्रिय शेती, पंचायत राज, सार्वजनिक प्रशासन अशा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान दिलेले आणि संबंधित क्षेत्रात किमान १५ वर्षांचा अनुभव असलेले प्रतिष्ठित तज्ज्ञ हे या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’अंतर्गत ‘प्राध्यापक’ म्हणून निवडण्यासाठी पात्र असणार आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार, शिक्षणात परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणात औद्योगिक क्षेत्राच्या गरजा ओळखून नियमित शिक्षणात व्यवसाय शिक्षण अंतभूर्त करणे, त्यासाठी औद्योगिक-शैक्षणिक संस्थांचा सहयोग यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे.
............
*‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’चे उद्दिष्ट :*
१. उद्योग क्षेत्र व सामाजिक गरजा ओळखून शैक्षणिक अभ्यासक्रम विकसित करणे
२. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित तज्ज्ञांना शिक्षणात सहभागी करून घेणे
३. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना अनुभवावर आधारित शिक्षणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे
............
* जबाबदाऱ्या व कर्तव्ये :*
- शैक्षणिक अभ्यासक्रम विकसित करताना सहभागी होणे
- नवीन अभ्यासक्रमांची आखणी करणे
- विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन आणि उद्योजकता विकसित होण्यासाठी प्रोत्साहन देणे
- गरज भासल्यास विद्यार्थ्यांना मेंटॉरशिप देणे
- शिक्षण संस्था आणि उद्योग यांच्यातील संबंध वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित करणे
.........

उद्योग आणि शिक्षण यात दुवा साधण्याचे काम याद्वारे होणार असून, हे निश्चितच स्वागतार्ह आहे. उद्योग आणि शिक्षण संस्थांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार असल्याने शिक्षण व्यवस्थेला नवा आयाम मिळेल.
- प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए)
.........
प्रतिष्ठित तज्ज्ञांच्या अनुभवावर आधारित शिक्षण देताना विद्यार्थ्यांनाही संबंधित क्षेत्राचा नेमका आवाका लक्षात येईल. त्याशिवाय ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’मुळे विद्यार्थ्यांना अधिकाधिक व्यवसायाभिमुख शिक्षण मिळण्याचे मार्ग खुले होणार आहेत. अनुभवी तज्ज्ञांच्या सल्ल्याने अभ्यासक्रम निश्चित झाल्यास शिक्षणात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे.
- सनदी लेखापाल ऋता चितळे, विभागीय समिती सदस्य, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल, आयसीएआय