पिंपरी - मिळकतकर थकबाकी असलेल्या व्यावसायिक २१ मालमत्ता जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

property tax
व्यावसायिक २१ मालमत्ता जप्त

पिंपरी - मिळकतकर थकबाकी असलेल्या व्यावसायिक २१ मालमत्ता जप्त

पिंपरी - मिळकतकर थकबाकी असलेल्या २१ मालमत्तांवर महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने गेल्या चार दिवसांत जप्तीची कारवाई केली. पैकी १२ मालमत्ताधारकांनी त्वरित ९२ लाख ९३ हजार ४७३ रुपये थकीत कर जमा केला आहे.

शहरातील ३१ हजार ९७१ व्यावसायिक मिळकतधारकांना जप्तीच्या नोटीस दिल्या आहेत. त्यांच्याकडे तब्बल ६३१ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. यातील चिखली व भोसरीमधील औद्योगिक आणि बिगरनिवासी २१ थकबाकी असलेल्या मिळकती जप्त केल्या आहेत. नऊ मालमत्ता सील केल्या आहेत. त्यातील पाच जणांनी मंगळवारपर्यंत (ता. ४) कराचा भरणा केला आहे. उर्वरित चार मालमत्ताधारकांनी अद्याप कराचा भरणा केला नाही. मालमत्ता जप्त केल्यापासून २१ दिवसांत कर न भरल्यास या मालमत्तांचा जाहीर लिलाव केला जाणार आहे.

पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक एक हजार ३६१ मालमत्तांवर या महिन्यातच जप्तीची कारवाई केली जाणार आहे. तसेच, ५० टक्यांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या सोसायट्यांची यादी केली जात आहे. एक लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या सदनिकाधारकांवरही कारवाई करण्याचे नियोजन केले आहे, असे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

थकबाकीदार व्यावसायिक मालमत्ता

  • पन्नास हजारांवर थकबाकी - २६ हजार ७६०

  • पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी - १ हजार ३६१

  • एकदाही करभरणा न केलेल्या - ३ हजार ८५०

  • एकूण थकबाकीदार मालमत्ता - ३१ हजार ९७१

  • शहरातील एकूण मिळकती - ५ लाख ७९ हजार

  • चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत करभरणा - ३६२ कोटी