रिक्षा मीटर प्रमाणीकरणाच्या मिळेनात पावत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा मीटर प्रमाणीकरणाच्या मिळेनात पावत्या
रिक्षा मीटर प्रमाणीकरणाच्या मिळेनात पावत्या

रिक्षा मीटर प्रमाणीकरणाच्या मिळेनात पावत्या

sakal_logo
By

पिंपरी, ता.६ : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या रिक्षा मीटर प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) प्रक्रिया सुरू आहे. पासिंगसाठी प्रत्येक रिक्षाचालकाला हे बंधनकारक आहे. भाडेवाढ लागू केल्यानंतर नवे दर मीटरमध्ये दिसण्यासाठी आवश्यक असणारी मीटर कॅलिब्रेशनची प्रक्रिया केली जाते. सध्या साडेपाचशे रुपये घेवुन प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्र दिले जाते. परंतु, शुल्काची पावती संबंधित परिवहन शासन नियुक्त एजन्सीकडून रिक्षाचालकांना मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

शहरात सुमारे एक लाख नोंदणीकृत रिक्षा आहेत. इंधन दरवाढीनुसार भाडेवाढ झालेली आहे. त्यामुळे, वेळोवेळी मीटरचे प्रमाणीकरण चालक करून घेत आहेत. गेल्या अडीच वर्षात भाडे १८ रुपये मीटर वरून २१ रुपये झाले होते. आता २५ रुपये मीटर दरवाढ झालेली आहे. प्रत्येकवेळी मीटर प्रमाणीकरण करावे लागते.

प्रत्यक्ष रिक्षाचालकांशी ‘सकाळ’ प्रतिनिधीने संपर्क साधला त्याच्या पावत्या रिक्षाचालकांना मिळत नसल्याचे आढळून आले आहे. शाहूनगरमधील आरटीओ परिवहन कार्यालयाने नेमलेल्या एजन्सीज प्रमाणीकरण करण्यासाठी प्रत्येकी ५५० रुपये घेतात. परंतु त्याची रीतसर पक्की पावती आजतागायत कोणालाही दिली जात नसल्याच्या तक्रारी चालकांनी केल्या आहेत. संघटनांनीही याविषयी आवाज उठवलेला नाही. पैसे दिल्यावर दोन मिनिटांत मीटर प्रमाणीकरण करून ठराविक अंतर रिक्षा चालवून तपासले जाते. मीटर प्रमाणपत्रानुसार दुसऱ्या दिवशी पुन्हा आरटीओ अधिकारी त्याच पद्धतीने टेस्टिंग करतात. चाचणी झाल्यावर रिक्षा चालकांना पुन्हा एका रांगेत थांबवले जाते. आरटीओ कर्मचारी मीटरला सील लावतात. सील लावण्यासाठी कधी पन्नास, तर कधी तीस रुपये घेतले जातात. आहेत. हे पैसे देखील आरटीओमधील कर्मचाऱ्यांच्या अवतीभवती असणारे काही एजंट आकारत असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.

मीटर कॅलिब्रेशन प्रक्रियेसाठी मीटर काढणे, सॉफ्टवेअर अपडेट करणे, आरटीओची मंजुरी घेणे अशी वेळखाऊ प्रक्रिया असल्याने ९९ टक्के रिक्षा चालक पैसे देऊन पुढे जातात. मग, आरटीओ अधिकारी मीटरचे सील पाहून मीटर प्रमाणपत्र रिक्षाचालकांच्या हातात देत रिकामे होतात. अशा प्रकारे कॅलिब्रेशन व्यतिरिक्त प्रत्येकी पन्नास किंवा तीस रुपये प्रत्येक रिक्षाचालकांकडून वेगळे घेतले जात आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांसाठी एजंटगिरी करणारे मीटर प्रमाणीकरणासाठी बेकायदेशीरपणे पैसे वसूल करत आहेत. वर्षानुवर्षे ही पद्धत सुरु असून आरटीओ अधिकाऱ्यांचीही याकडे डोळेझाक आहे.
---
कोट
मीटर प्रमाणीकरण हा एक प्रकारचा काही लोकांसाठी पर्वणीचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्वी रिक्षा चालक होते. त्यांनी ही अनधिकृत लूट बंद करावी. त्यावर नियंत्रण आणावे. आरटीओ अधिकाऱ्यांनी देखील याकडे डोळेझाक न करता कारवाई करावी.
- दिलीप डोळस, अध्यक्ष, तळेगाव दाभाडे शहर रिक्षा संघ
--
कॅलिब्रेशन झाले आहे की नाही हे ट्रॅकवर वाहन घेतल्यानंतर निरीक्षक पाहत असतात. ते योग्य असल्यास अधिकारी सील करून प्रमाणपत्र देतात. हे काम करणारी एजन्सी शासन नियुक्त आहे. अशा काही तक्रारी असल्यास त्यांचे निरसन करण्यात येईल.
- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
--
दोन दिवसापूर्वी कॅलिब्रेशन करून घेतले. रांगेत दोन तास उभा होतो. साडेपाचशे रुपयाची पावती मागितल्यास ती मिळाली नाही. प्रमाणपत्रावर रिक्षा वेटिंग शुल्क १०२ रुपये घेतल्याचा उल्लेख आहे. पावती दोन वेळा मागूनही दिली नाही. व्यवसायाची गडबड असते. म्हणून आम्ही पण विषय सोडून देतो.
- नीलेश साळुंके, रिक्षा व्यावसायिक, सांगवी