पिंपरी-चिंचवडमध्ये खंडेनवमी उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये खंडेनवमी उत्साहात
पिंपरी-चिंचवडमध्ये खंडेनवमी उत्साहात

पिंपरी-चिंचवडमध्ये खंडेनवमी उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी-चिंचवडमध्ये खंडेनवमी उत्साहात

पिंपरी, ता. ४ : रोषणाई, झेंडूची फुले, आंबा, केळीच्या पानांनी सजवलेले प्रवेशव्दार, समोर सुंदर रांगोळी अशा उत्साही वातावरणात यंत्रपूजन करून पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत खंडेनवमी मंगळवारी (ता.४) साजरी करण्यात आली. कामगारांना मिठाई वाटपही करण्यात आले. काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.
शहर व परिसरात सात हजारांहून अधिक छोटे-मोठे उद्योग आहेत. औद्योगिकनगरी असा लौकिक असलेल्या शहरात दरवर्षी खंडेनवमी मोठ्या उत्साहात साजरी होत असते. हा उत्साह मंगळवारीही पहायला मिळाला. कंपनीतील यंत्रांची सकाळी लवकरच साफसफाई व सजावट करण्यात आली. कंपनीचे मालक, अधिकारी, कामगारांची दिवसभर लगबग सुरू होती. दुपारनंतर पारंपरिक पद्धतीने यंत्रांचे पूजन करण्यात आले. काही कंपन्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धांचे आयोजनही केले होते. फुलांची आरास करुन यंत्रांना सजविले गेले होते. पारंपरिक पद्धतीने पूजा केल्यानंतर कामगारांना मिठाईचे वाटप करण्यात आले. काही कामगार कुटूंबासह पूजेला उपस्थित होते. ज्येष्ठ कामगारांनाही पूजेचा मान देण्यात आला. कामगारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. कामगारांची ने-आण करणाऱ्या बसगाड्याही फुलांनी सजविल्या होत्या.
निगडी, चिंचवड यासह केएसबी चौक, लांडेवाडी चौक, इंद्रायणीनगर, नेहरूनगर, खंडोबामाळ, थरमॅक्स चौक, यमुनानगर, चिखली, तळवडे या ठिकाणी झेंडूची फुले व पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. विविध कार्यक्रमांत कामगारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.