आठशे मुलांची शाळा भरते वीटभट्टीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School on Brick kiln
वीटभट्टवर भरते कल्पक शाळा

आठशे मुलांची शाळा भरते वीटभट्टीवर

पिंपरी - हातावर पोट भरणारा वीटभट्टीवरील कामगार दिवस उगवला की कामावर जातो. पूर्वी शिक्षणाचा कसलाही गंध यांना नव्हता. मात्र, आता मुलांना शाळेच्या भिंतीतच अडकवून न ठेवता प्रत्यक्ष वीटभट्टीवर निसर्गातील अनुभूतीच्या भेटीतून मुलांना ‘इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी’कडून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. सध्या संस्थेमार्फत रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड, माण, नांदे, चांदे या परिसरातील वीटभट्ट्यावरील ८०० मुले अनौपचारिक शिक्षण घेत आहेत.

वीटभट्ट्यांवर राहत असल्यामुळे शिक्षणात मागे पडणाऱ्या मुलांसाठी ‘इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी’ही संस्था अनेक वर्षांपासून काम करत आहे. वीटभट्टीवर राहणारी बहुतेक मुले महापालिकेच्या शाळेत जातात. या मुलांपुढे अनेक प्रश्‍न असतात. घरची गरिबी, वस्तीतले अभ्यासाला पोषक वातावरण नसल्यामुळे मुलांची परिस्थिती आणखी बिकट असते. वीटभट्टीपासून त्यांच्या शाळांचे अंतर दूर असते. तिथपर्यंत जायचे तर त्यांना पायपीट करावी लागते.

त्यामुळे त्यांचे पालक मुलांना शाळेत पाठवतच नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातल्या वेगवेगळ्या वस्त्यांमधील आणि शहराबाहेरच्या वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शाळेच्या चार भिंतीपलीकडचे शिक्षण देण्याचे काम ही संस्था गेली ३५ वर्षे करत आहे.

आमच्या नशिबी जे आले ते मुलाच्या नशिबी येऊ नये. ती शिकली पाहिजेत. म्हणून या शाळेत पाठवत आहोत.

- संगीता राठोड, पालक (चौधरी भट्टी, घोटावडे )

संस्थेतून मुलांना देण्यात येणाऱ्या पौष्टिक आहारामुळे मुले सुदृढ राहतील.

- रूपाली शिंदे, पालक (राम बोडकेभट्टी, माण)

संस्थेच्या क्लासला मुले येऊ लागल्यामुळे वीटभट्टीतील मुलांच्या व्यावहारिक ज्ञानात वाढ झाली.

- विशाखा शिरोळेस, पालक (ओझरकर भट्टी, माण)

संस्थेच्या क्लासमुळे पोर बालकामगार झाली नाहीत. इथे शाळा नसती तर ती बालकामगार झाली असती.

- अनुराधा कापसे, पालक (भवर भट्टी, ताथवडे)

या संस्थेतर्फे मुला-मुलींना शाळेच्या पुस्तकांपलीकडे आणखीही काही गोष्टी शिकवल्या जातात. त्यांची समज वाढेल, असा प्रयत्न केला जातो. स्वतःच्या शरीराची, ओळख करून दिली जाते. चांगले-वाईट स्पर्श ओळखणे, मुलगा किंवा मुलगी असा भेद न करणे या गोष्टीही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. मुलांप्रमाणेच त्यांच्या पालकांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते.

- मेधा मोघे, कार्यकारी संचालक, ‘इंडिया स्पॉन्सरशिप’

भाषिक खेळ

भाषा शिक्षणात मुलांना खऱ्या अर्थाने अडचण येते ती म्हणजे व्याकरणयुक्त लिहिण्याची. त्यातल्या त्यात मराठी लिहिताना मुलांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी शोधा म्हणजे सापडेल, शब्दफुले, शब्दचक्र, धूळपाटी, टोपी बदला या छोट्या छोट्या भाषिक खेळात्मक उपक्रमांद्वारे त्या मुलांना भाषा विषयात समृद्ध करत आहेत. मुलांना १६ जण शिकवत आहेत.

सोप्या पद्धतीने अध्यायन

संस्थेने मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची पद्धत तयार केली आहे. त्यानुसार मुलांच्या समजण्याच्या क्षमतेनुसार त्यांचे वेगवेगळे गट केले जातात. काही मुलांना गणित, इंग्रजीसारखी विषय अवघड वाटतात, तर काहींना विज्ञान, इतिहास समजत नाही. काही मुलांना अक्षरांची ओळख व्यवस्थित नसल्याने वाचन करताना अडचणी येतात. या अडचणी लक्षात घेऊन त्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवले जात असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी ज्योती धिवार यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f03441 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top