पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी भाजपा व मनसे युतीबाबत संभ्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS-BJP
पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी भाजपा व मनसे युतीबाबत संभ्रम

पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी भाजपा व मनसे युतीबाबत संभ्रम

पिंपरी - आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होण्याच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली वरिष्ठ व स्थानिक पातळीवर दिसत नाहीत. परंतु, भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्यात पूवीप्रमाणेच युती कायम राहणार आहे. मात्र, भाजप व आरपीआय यांच्यातही कोणाला किती जागा या बाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांना हटविण्याची घोषणा केल्यानंतर भाजप व मनसे हिंदुत्वाच्या मुद्दावर आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येतील, असे काहीसे चित्र पिंपरी-चिंचवडसह राज्यात झाले होते. भोंग्यांच्या प्रकरणावर भाजपच्या मातृसंस्थेशी म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी मनसेला पत्र देऊन जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर पुण्यात घेतलेल्या सभेत भाजपावरीही टीका केल्यानंतर भाजप व मनसे युतीच्या चर्चा थांबल्या आहेत.

भाजपचे प्रदेश पातळीवरील नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मनसे प्रमुख राज ठाकरे युतीबाबत काय निर्णय घेतात, यावरच पुढील चित्र अवलंबून आहे. तर, भाजप व आरपीआयच्या जागा वाटपाबाबतही वरिष्ठ व स्थानिक पातळीवर अद्याप चर्चेला सुरुवात झालेली नाही.

‘मनसेबरोबर युतीबाबत अद्याप वरिष्ठ नेत्यांकडून काहीही आदेश आलेले नाहीत. आरपीआयसोबत पूर्वीप्रमाणे युती राहणार आहे. प्रदेशकडून सूचना आल्यानंतर आम्ही स्थानिक पातळीवर आरपीआय (आठवले) शहराध्यक्षांबरोबर चर्चा करू. सध्या भाजपच्या बूथ पातळीवरील बैठका सुरू आहेत. सर्व १३९ जागांचे नियोजन सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आजारी असल्याने बूथ संमेलन पुढे ढकलले आहे. येत्या काही दिवसांत बूथ संमेलन होईल.’

- आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष, भाजप पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा

‘युतीबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. युती करायची की नाही, याचा अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील. पक्षाचे प्रभारी गणेश सातपुते, रणजित शिरोळे, किशोर शिंदे यांच्याकडूनही अद्याप काही सूचना नाहीत. आम्ही आमची स्वतंत्र लढण्याची तयारी रू केली आहे. पक्षाच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघातील बैठका घेतल्या आहेत. बूथ निहाय बूथ प्रमुख नेमले आहेत.’

- सचिन चिखले, शहराध्यक्ष, मनसे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा

‘मित्रपक्ष भाजपच्या स्थानिक नेत्यांबरोबर लवकर बैठक होणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार व अन्य स्थानिक नेत्यांबरोबर लवकरच बैठक होईल. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार भाजपसोबत युती राहणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये रिपब्लिकन पक्षाला ३९ जागा द्याव्यात आणि रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद द्यावे, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत.’

- स्वप्नील कांबळे, शहराध्यक्ष, आरपीआय (आठवले) पिंपरी-चिंचवड शहर

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f03503 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top