Pimpri-Chinchwad चिखलीत कंपनीत शिरून एकाला बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
गुन्हे वृत्त

Pimpri-Chinchwad : चिखलीत कंपनीत शिरून एकाला बेदम मारहाण

पिंपरी : दारू पिऊन कंपनीत शिरून एकाला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याचा प्रकार चिखलीतील कुदळवाडी येथे घडला. याप्रकरणी संतोषकुमार तेजनारायण राऊत (रा. पवारवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार राम करण यादव याच्यावर गुन्हा दाखल झाला.

फिर्यादी हे त्यांच्या लक्ष्मण इंजिनिअरिंग या कंपनीत काम करीत होते, त्यावेळी आरोपी कंपनीत दारू पिऊन आला. लाइट व मशिन बंद करत असताना फिर्यादीने त्याला घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी तो फिर्यादीला शिवीगाळ करू लागला. तो मशिन बंद करत असताना फिर्यादीने त्याला अडवले, तेव्हा त्याने फिर्यादीला बेदम मारहाण करून खाली पाडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. दरम्यान, आरोपीने पुन्हा फिर्यादीच्या डोक्यात मारले.

नोकरीच्या आमिषाने फसवणूक

स्कॉटलंड येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले. मात्र, नंतर नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सतनाम सिंग ऊर्फ राजीव शर्मा (रा. वेस्ट मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल झाला. आरोपी व फिर्यादीची सप्टेंबर २०१९ ला रेल्वेने प्रवास करीत असताना ओळख झाली. दरम्यान, आरोपीने स्कॉटलंड येथील द स्कॉटिश सेलमन कंपनी येथे फिर्यादीचा भाऊ संदीप याला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादीसह त्यांची आई व भावाच्या बँक खात्यातून आठ लाख २० हजार रुपये सतनाम सिंग ऊर्फ राजीव शर्मा याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले. त्यानंतर आरोपीने स्कॉटलंड येथे नोकरी न लावता, तसेच दिलेले पैसे परत न देता फसवणूक केली.

गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

गांजा बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अरविंद गोरख साठे (वय २२, रा. काळाखडक, वाकड) याला अटक केली, तर सागर याच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई काळाखडक येथे केली. साठे हा गांजा बाळगून सेवन करताना आढळला. हा गांजा त्याने सागर यांच्याकडून आणल्याचे समोर आले.

सांगवीत सोनसाखळी हिसकावली

भरदुपारी पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावल्याची घटना सांगवी येथे घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी या रस्त्याने पायी जात असताना, पाठीमागून दुचाकीवरून दोघेजण आले. त्यापैकी मागे बसलेल्याने फिर्यादीच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली, त्यानंतर चोरटे पसार झाले.