Pimpri-Chinchwad काळेवाडीत तरुणाची अडीच लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri-Chinchwad
गुन्हे वृत्त

Pimpri-Chinchwad : काळेवाडीत तरुणाची अडीच लाखांची फसवणूक

पिंपरी : कॅमेऱ्यासह इतर साहित्य भाड्याने घेतले. मात्र, नंतर हे साहित्य परत न देता तरुणाची अडीच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार काळेवाडी येथे घडला. या प्रकरणी दत्तात्रेय तुकाराम येवले (रा. गजानननगर, काळेवाडी फाटा, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, सय्यद मोहंमद झिबिउल्ला (वय २७, रा. वाघोली) व त्याचा साथीदार (वय २२) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी कॅमेरा भाड्याने घेऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, दोन लाखांचा कॅमेरा, दोन लेन्स, एक बॅटरी, एक चार्जर, एक बॅग, मेमरी कार्ड असा एकूण दोन लाख ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादीकडून घेतला.

मात्र, हा माल परत न देता फिर्यादीची फसवणूक केली.

तरुणीशी अश्लील वर्तन
तरुणीला शिवीगाळ करणे, तिचा पाठलाग करुन अश्लील वर्तन करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्या इंन्टाग्राम अकाऊंटवरील मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार म्हाळुंगे येथे घडला. मोतीलाल चव्हाण (वय २१, रा. हैद्राबाद) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपीने इंस्टाग्राम अकाऊंटवरून फिर्यादीशी ओळख केली. यातून त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. परंतु, फिर्यादीचे कॉलेज सुरु झाल्यानंतर अभ्यासामुळे तिने आरोपीकडे दुर्लक्ष केले. त्याच्याशी बोलणे बंद केले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला म्हाळुंगे येथील राधा चौक येथे थांबवले.

अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. तिच्या मैत्रिणींशी फिर्यादीविषयी फोनवर वाईट बोलला. फिर्यादीच्या आई-वडिलांना फोनवरून ''तुमची मुलगी कॉलेजच्या गेटच्या आत कशी येते. तेच बघतो तिला मारूनच टाकतो'' अशी धमकी दिली.

गळ्याला हत्यार लावून मोबाईल हिसकावला
तरुणाच्या गळ्याला हत्यार लावून दोन अज्ञात व्यक्तींनी त्याचा मोबाईल हिसकावल्याचा प्रकार देहूगाव येथे घडला. या प्रकरणी ज्योतीराम बबन सपकाळ (रा. चव्हाण नगर भाग १, देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी हे विठ्ठलवाडी येथील रस्त्याने जात असताना बस थांब्याजवळ आरोपींनी फिर्यादी यांना कमरेचा पट्टा दाखवून दमदाटी केली. त्यांच्या गळ्याला कोयत्यासारखे हत्यार लावून पॅन्टच्या खिशातील सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला.

देहूरोडमध्ये पाकीटचोरला नागरिकांनी पकडले
पाठीमागून धक्का मारून पाकीट मारणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार देहूरोड येथे घडला. सतीश काकासाहेब काकडे (वय २४, रा. किवळे बसस्टोप जवळ, किवळे) असे त्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी राजेंद्र दत्तात्रेय चव्हाण (रा. भोंडवे वस्ती, रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे रविवारी (ता.१६) सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या पत्नीसह भाजीपाला घेण्यासाठी जात होते.

दरम्यान, देहूरोड पूलाखालील सवाना चौक येथे आरोपीने फिर्यादी यांना पाठीमागून धक्का मारून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पाकीट चोरले. त्यामध्ये, अडीच हजारांची रोकड होती. पाकीट चोरून पळून जात असताना फिर्यादी यांनी लोकांच्या मदतीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.