जनसंवाद कमी ; शेजाऱ्यांच्या तक्रारीच जास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनसंवाद कमी ; शेजाऱ्यांच्या तक्रारीच जास्त
जनसंवाद कमी ; शेजाऱ्यांच्या तक्रारीच जास्त

जनसंवाद कमी ; शेजाऱ्यांच्या तक्रारीच जास्त

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ ः नागरिकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब महापालिकेची ध्येयधोरणे, विविध निर्णयात दिसावे, नागरिक व प्रशासनात सुसंवाद राखावा, तक्रारींचे निवारण जलदगतीने व्हावे, या हेतूने महापालिका प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभा घेत आहे. मात्र, त्यात जनतेचा संवाद कमी आणि शेजाऱ्या-पाजाऱ्यांबद्दल तक्रारी तसेच व्यक्तिगत स्वार्थाच्या सूचनांचाच अधिक भडीमार होत असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एप्रिल महिन्यापासून प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभा होत आहेत. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जनसंवाद सभेत सुरवातीला सामान्य नागरिक आपापल्या तक्रारी मांडत होते. सार्वजनिक हिताच्या सूचना मांडत होते. मात्र, गेल्या काही सभांपासून व्यक्तिगत हिताच्या सूचना व एकमेकांविषयीच्या तक्रारीच अधिक होताना दिसत आहे. सोमवारच्या (ता.१७) सभेत ८० तक्रारी व सूचना प्राप्त झाल्या. यात रस्ता दुभाजकांमध्ये लावलेल्या शोभेच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी योग्य प्रकारे करावी, विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक संख्येने विरंगुळा केंद्र उभारावेत, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कारवाई करावी, अतिक्रमणे काढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, जलवाहिन्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त कराव्यात, रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, खराब जलवाहिन्यांच्या ठिकाणी नव्याने जलवाहिन्या टाकाव्यात, रस्त्यांच्या मध्यभागी व पदपथावरील पेव्हिंग ब्लॉक तात्काळ बसवावेत, फुटलेल्या जलनिस्सारण वाहिन्या लवकर दुरुस्त कराव्यात, नव्याने बसस्थानके उभारावेत, बीआरटी रस्त्यावरून खासगी वाहनांना मज्जाव करावा, अशा सूचना व तक्रारींचा समावेश होता.
‘ब’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत बोलताना अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले,‘‘शहरातील महत्त्वपूर्ण सोयीसुविधा, विविध प्रकल्प, उपक्रम आणि योजनांची माहिती प्रत्येक नागरिकाला असावी यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी नागरी सहभाग घ्यावा. जनसंवाद सभाही माहितीच्या आदान प्रदानासाठी प्रभावी माध्यम आहेत. त्यासह प्रशासनातील कामकाजात अद्ययावत संगणक प्रणालीचा वापर, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेल्या सारथी अॅपचा अधिकाऱ्यांनी आधार घ्यावा.’’