बाजारपेठेवर आकाश कंदिलांचा लखलखाट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजारपेठेवर आकाश कंदिलांचा लखलखाट!
बाजारपेठेवर आकाश कंदिलांचा लखलखाट!

बाजारपेठेवर आकाश कंदिलांचा लखलखाट!

sakal_logo
By

पिंपरी, ता.१८ : प्रकाशाचा उत्सव असलेला सण म्हणजे दीपोत्सव! दिवाळी ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीनिमित्त सगळीकडे दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. घरातील साफसफाईपासून नवीन वस्तू खरेदी करण्यात सगळे व्यस्त असल्याचे दिसत आहे. तसेच, विविध तोरण, रांगोळ्या व आकाशकंदील, पणत्या यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे. दुकानात लटकलेले आकर्षक आकाश कंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

दिवाळी सणामध्ये कंदिलाला मोठे महत्त्व आहे. यानिमित्त दारात कंदील लावला जातो. दरवर्षी प्रमाणे यंदाही बाजारपेठांमध्ये वेगवेगळ्या रंगाचे, विविध प्रकारचे व आकाराचे कंदील विक्रीस आहेत. साध्या पातळ व जाड रंगीबेरंगी कागदापासून बनविलेले, कापडी आकाशकंदील सुद्धा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. यावेळी कंदीलमध्ये नवीन प्रकार दिसत आहेत, सजावटीसाठी वापरले जाणारे छोट्या आकारातील कंदील १० रुपयांना मिळत आहेत तर इतर प्रकारात किंमती २०० ते १५०० रुपयांपर्यंत आहेत. यावर्षी किंमतीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पिंपरी, भोसरी आदी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी आहे.

बाजारात तोरण कंदील, करंजी कंदील, हंडी कंदील, झुंबर कंदील, पारंपारिक षटकोनी कंदील, झोपडी कंदील, चौकोनी कंदील असे कंदील उपलब्ध आहेत. यात करंजीची किंमत ४० ते ७००, पारंपारिक षटकोनीची २० ते १३ हजार आणि चौकोनीची किंमत १०० ते १००० रूपयांपर्यंत आहे. दरम्यान, काही ठिकाणी प्लास्टिकचे, कापडी कंदील यांचा समावेश आहे. त्यामुळे कागदाचे, तसेच हाताने बनविण्यात येणारे कंदील मागे पडले आहेत. १०० ते ७०० रुपयांपर्यंत चायनीज, व पन्नास ते पाचशे रुपयांपर्यंत कागदाचे कंदील बाजारात आहेत.

एक प्रमुख हिंदू सण
दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते, पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येत असतो. या सणाला भारतात बव्हंश ठिकाणी सुटी असते. हा एक पवित्र हिंदू सण आहे जो वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचे प्रतीक आहे. उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.

कोट
‘‘दोन वर्षांपासून कोरोनामुळे सण उत्सव यांच्यावर निर्बंध असल्याने मागणी कमी होती. परंतु यंदा प्रतिसाद मिळत आहे. तसेच घरगुती कंदील खरेदीसाठी उत्साह दिसत आहे.’’
-अंकित ठाकूर, विक्रेता