गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने तरुणाला बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने 
तरुणाला बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने तरुणाला बेदम मारहाण

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने तरुणाला बेदम मारहाण

sakal_logo
By

पिंपरी : गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने तिघांनी मिळून एकाला बेदम मारहाण करीत कोयत्याने वार केला. ही घटना वाकड येथील काळाखडक येथे घडली. याप्रकरणी संदीप ऊर्फ बाळू शांताराम भोसले (वय ३२, रा. काळाखडक, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल विलास चव्हाण (वय २९), गणेश विलास चव्हाण (वय २५) व दादा गंगावणे (वय २५, तिघेही रा. काळाखडक, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या मोटारीतून घरी निघाले होते. त्यावेळी काळाखडक येथील पाण्याच्या टाकीजवळ त्यांच्या तोंड ओळखीच्या आरोपींनी त्यांची मोटार रस्त्यात आडवी लावली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना मोटार बाजूला घेण्यास सांगितली. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांना ‘मीच इथला भाई आहे’, अशी धमकी दिली. तसेच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गणेश याने राहुल याला बोलावून घेत फिर्यादीला मारहाण केली. तसेच गणेश याने कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर वार केला. त्यांनी हा वार चुकविल्याने त्यांच्या कपाळावर दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी त्यांना खाली पाडून मारहाण केली.
------------------------

बदनामीच्या धमकीप्रकरणी एकावर गुन्हा
घरात कूकचे (स्वयंपाकी) काम करणाऱ्याने महिलेला वारंवार फोन करून त्रास दिला. त्यानंतर महिलेच्या पतीच्या मोबाईलवर फोन करून महिलेची बदनामी करण्याची धमकी दिल्याचा प्रकार रावेत येथे घडला. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार किशोर मोहंती (वय ४५, रा. मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचे पती २००३ मध्ये ठाणे येथे एका कंपनीत कामाला होते. त्यावेळी ते कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये राहत असताना आरोपी हा तेथे कुक म्हणून कामाला होता. २०२० मध्ये आरोपीने महिलेच्या मोबाईलवर कॉल केला. घरातील लोकांची विचारपूस केली. त्यानंतर तो सातत्याने महिलेला फोन करू लागला. २०२१ मध्ये आरोपी वारंवार फोन करू लागल्याने महिलेने त्याला माझ्याशी बोलू नको, तसेच फोन करू नको, असे सांगितले. त्याचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला. त्यानंतर किशोरने महिलेच्या पतीच्या फोनवर कॉल व मेसेज केला. ‘तू माझ्याशी फोनवर बोलली नाही तर मी तुझी बदनामी करेल’, अशी धमकी दिली.
-----------------
विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा
माहेरहून दुचाकीसाठी पैसे आणण्याची मागणी करीत सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पीडित विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश संपतराव वाघमारे (वय २७), सासरा संपतराव भानुदास वाघमारे (वय ६३), दीर स्वप्नील संपतराव वाघमारे (वय ३०), चुलत सासरा गौतम भानुदास वाघमारे, भागवत भानुदास वाघमारे, गोविंदराव काळे (वय ६० रा. बीड), प्रकाश दादाराव गवळी (वय ६३, रा. उस्मानाबाद) व दोन महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दुचाकीसाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करीत सासरच्यांनी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.
------------------------
नोकरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक
इंडिगो एअरलाईन कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत चौघांनी एका महिलेची फसवणूक केली. हा प्रकार ओएलएक्स अ‍ॅपच्या माध्यमातून घडला. याप्रकरणी संबंधित महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फेडरल बँक अकाऊंटधारक अनिलकुमार, एक महिला व दोन मोबाईलधारक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी महिलेला इंडिगो एअरलाईन कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांनी ओएलएक्स अ‍ॅपचा वापर केला. आरोपींनी त्यांना इंडिगो एअरलाईन कंपनीचे आय कार्ड दाखविले. कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचे हरविलेले हे आयकार्ड होते. त्यानंतर आरोपींनी महिलेकडून ऑनलाइन पद्धतीने ११ हजार ५०० रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली.
------
------------------