Crime रिक्षाचालकाला मारहाण करून वल्लभनगरमध्ये ऐवज लुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
रिक्षाचालकाला मारहाण करून वल्लभनगरमध्ये ऐवज लुटला

Crime : रिक्षाचालकाला मारहाण करून वल्लभनगरमध्ये ऐवज लुटला

पिंपरी : रिक्षाचालकाला मारहाण करून ऐवज लुटल्याचा प्रकार वल्लभनगर येथे घडला. या प्रकरणी बाबू सुवर्णराव गुंठे (रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांची रिक्षा घेऊन वल्लभनगर येथील मेट्रो स्थानकाजवळ थांबले होते.

दरम्यान, दुचाकीवरून चौघेजण तेथे आले. त्यांनी ‘हाच आहे, हाच आहे’ असे म्हणून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी तोंडावर जबर मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या खिशातील साडे सहा हजारांची रोकड असलेले पाकीट व आठ हजारांचा मोबाईल हिसकावून संत तुकारामनगरच्या दिशेने पसार झाले.

वेश्याव्यवसाय प्रकरणी महिलेला अटक
पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली. ही कारवाई रावेत येथे करण्यात आली. पंचवीस वर्षीय आरोपी महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवीत असत. या कारवाईत आठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लॅपटॉप स्वस्तात देण्याच्या बहाण्याने फसवणूक
लॅपटॉप स्वस्तात देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार ऑनलाईनद्वारे घडला. या प्रकरणी प्रशांत प्रदीप धुमाळ (रा. कोयनानगर, चिखली रोड, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. क्विकर वेबसाइटवर ब्रँडेड कंपनीचे लॅपटॉप स्वस्तात देण्याची जाहिरात देऊन फिर्यादी यांना वेळोवेळी व्हाट्सअप कॉल व मेसेज करून वेळोवेळी पैशांची मागणी केली.

त्यानंतर लॅपटॉप न पाठवता तसेच लॉयड सायबर स्पोर्ट ८८ या वेबसाइटवर फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळे चार्जेस सांगून फिर्यादी यांची एकूण एक लाख १८ हजारांची फसवणूक केली.

भोसरीत एकावर कोयत्याने वार
शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना भोसरीतील भगत वस्ती येथे घडली. या प्रकरणी गौतम गिरीश नाईक (रा.गव्हाणेवस्ती, लोंढेआळी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कैलास कैदारे (रा. भगतवस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या मित्राच्या आई व बहिणीला आरोपी शिवीगाळ व मारहाण करीत होता. म्हणून फिर्यादी व त्याचा मित्र हे जाब विचारण्यासाठी आरोपीकडे गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात व हातावर कोयत्याने वार केले. यामध्ये ते जखमी झाले.