एसटीच्या मुक्कामी कर्मचाऱ्यांना मिळेना ‘अभ्यंग भेट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीच्या मुक्कामी कर्मचाऱ्यांना मिळेना ‘अभ्यंग भेट’
एसटीच्या मुक्कामी कर्मचाऱ्यांना मिळेना ‘अभ्यंग भेट’

एसटीच्या मुक्कामी कर्मचाऱ्यांना मिळेना ‘अभ्यंग भेट’

sakal_logo
By

पिंपरी, ता.२२ ः दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांना अभ्यंगस्नानासाठी ‘अभ्यंग किट’ दिली जाते. परंतु, गेल्या आठ वर्षापासून कर्मचाऱ्यांना अद्याप साहित्य आणि फराळ मिळालेला नाही. परिणामी, परगावाहून मुक्कामी आलेल्या २०० कर्मचाऱ्यांच्या नशिबी अभ्यंगस्नानही नसल्याची वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे.

सहकुटुंब दिवाळी साजरी करण्याचा आनंद काही औरच असतो. उटणे लावून अभ्यंगस्नान केल्यानंतर खमंग फराळावर ताव मारला जातो. मित्र, मैत्रिणी, नातेवाइकांच्या भेटी घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. दिवाळीतील वातावरण खूपच प्रसन्नदायी असले तरी कुटुंबापासून दूर असलेल्या सुमारे २०० कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या जल्लोषापासून मुकावे लागते. अभ्यंगस्नानही कर्मचाऱ्यांच्या नशिबी नसते. मात्र, ही उणीव भरून काढण्यासाठी प्रशासनातर्फे आगारातील दिवाळी साजरी करण्यात केली जाते. प्रशासनाकडून दिवाळीमध्ये विश्रांतीगृहातील कर्मचाऱ्यांसाठी हा अनोखा उपक्रम राबवला जातो.

गेल्या आठ वर्षापासून व्यवस्थापनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे विश्रांतीगृहातील कर्मचाऱ्यांना उटणे, सुगंधी तेल, साबण, अंघोळीला गरम पाणी आणि फराळ जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. लांब पल्ल्याच्या बस घेऊन कर्मचारी वल्लभनगरमध्ये येतात. शहरात राहण्याची सोय नसल्याने आगारातील विश्रांतीगृहात थांबतात. ड्यूटी लागल्यानंतर विश्रांतीगृहातून पुन्हा जातात. कामाच्या व्यग्रतेमुळे वाहक, चालकांना कुटुंबासमवेत सण साजरा करण्यास वेळ मिळत नाही. सणामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याने प्रशासनाकडून जादा बस सोडल्या जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आवश्यकता अधिक भासते.

सणांच्या कालावधीत बहुतेक कर्मचारी कामावर असल्याने त्यांना सणाचा आनंद घेता येत नाही. दिवाळीच्या पहिल्या दिवशी कर्मचारी घराऐवजी एसटीच्या विश्रांती गृहात असतात. पहिले कर्तव्य नंतर वेळ मिळाला तर कर्मचारी सण साजरा करणाऱ्या मुक्कामी कर्मचाऱ्यांसाठी तरी अभ्यंग भेट दिली जावी, अशी अपेक्षा काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.