गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

गुन्हे वृत्त

नोकरीचे आमिष; महिलेची अडीच लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. २८ : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महिलेची अडीच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बावधन येथे घडला.
या प्रकरणी ४४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार डेबरिक कन्स्ट्रक्शन अँड पेट्रोलियम कंपनी एलएलसी अबुधाबी युएईचे पिट गुंडोगन, प्राईम विंग्स ट्रॅव्हल्स अँड टुरिझम सर्व्हिसेस, एलएलसी ऍड एएल शारकी आरडी फुजिराह, युएईचे हसन जमाल सईद , साहिर नवाज महमंद नवाज व त्याचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना नोकरीचे आमिष दाखवून मेल पाठविला. अकाउंट नंबर पाठवून त्यावर फॅमिली व्हिसासाठी प्रोसेसिंग फी म्हणून दोन हजार ९८० अमेरिकन डॉलर चलनाप्रमाणे दोन लाख ४० हजार भरण्यास सांगितले. फिर्यादीकडून पैसे घेतल्यानंतर नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली.

दुचाकी झाडाला धडकून तरुणाचा मृत्यू
दुचाकी झाडाला धडकून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना पुनावळे येथे घडली.
शादाब उर्फ शहजाद अलिहसन मन्सूरी (वय १९, रा. गायकवाडनगर, पुनावळे, मूळ-बिहार) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मोहमंद दिलकश मोकीम उद्दीन (वय १९) व राजू शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. शादाब, मोहमद व राजू हे तिघेही ट्रिपल सीट दुचाकीवरून जात होते. पुनावळे येथील गायकवाड नगर येथील ततवा प्रायमरी स्कूलच्या गेटसमोर ही दुचाकी रस्त्यातील एका झाडाला धडकली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने शादाब याचा मृत्यू झाला. तर, मोहमद व राजू हे गंभीर जखमी झाले. रावेत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोटारीच्या काचा फोडून दहशत
कोयता व काठ्यांनी मोटारीच्या काचा फोडून दहशत माजविल्याप्रकरणी सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार थेरगाव येथे घडला.
या प्रकरणी आदित्य शाम अहिरराव (रा. तापकीरनगर, काळेवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आशिष शेट्टे उर्फ दादल्या, विवेक बंडगर, आतिष कांबळे, दीपक बनसोडे व इतर दोन साथीदार (सर्व रा.रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी हे थेरगावातील गंगा आशियाना सोसायटीसमोरील रंगोली ढाब्यासमोर असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी कोयता व काठ्यांनी फिर्यादीच्या मोटारीच्या काचा फोडल्या. त्यानंतर, कोयता व काठ्या हातात भिरकावून ‘आम्ही इथले भाई आहोत, सर्वानी मापात रहायचे, नाहीतर गेम करू’ अशी धमकी दिली. त्यामुळे, घाबरलेल्या लोकांनी घराचे दरवाजे बंद केले.

चिखलीत कपड्याचे दुकान फोडले
शटर उचकटून दुकानात शिरलेल्या चोरट्याने एक लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना चिखलीतील म्हेत्रे वस्ती येथे घडली.
या प्रकरणी दीपक भरत राणावत (रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे म्हेत्रे वस्ती येथे कपड्यांचे दुकान असून या दुकानाचे शटर कुलूपासह उचकटून चोरटा आत शिरला. कपडे व रोख
रक्कम असा एकूण एक लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा
शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार वाल्हेकरवाडी येथे घडला.
या प्रकरणी सागर अप्पासाहेब लावंड (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळ- सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचिन ताम्हाणे (रा. राजयोग कॉलनी, वाल्हेकरवाडी) व त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे घरी असताना ताम्हाणे याने फिर्यादीला शिवीगाळ केली. ‘आम्ही इथले स्थायिक आहोत, तुम्ही इथले नाहीत’ असे म्हणत फिर्यादीसह त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला लोखंडी पट्टी मारून जखमी केले. चिंचवड पोलिस अधिक तपास करत आहेत.

मारहाण करून ऐवज लुटला
दगडाने मारहाण करून ऐवज लुटल्याचा प्रकार बिजलीनगर येथे घडला.
या प्रकरणी हितेश व्यंकटेश साखरे (रा. गुरुद्वाराजवळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यांच्या खिशातील बाराशे रुपयांची रोकड लुटली.