फार्मसीची प्रवेश प्रक्रिया रखडली; १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Admission
फार्मसीची प्रवेश प्रक्रिया रखडली ; १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

फार्मसीची प्रवेश प्रक्रिया रखडली; १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

पिंपरी - पॉलिटेक्निक, अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तरी अद्यापही फार्मसी प्रवेश प्रक्रिया मात्र सुरू झालेली नाही. त्यामुळे, विद्यार्थी चिंतेत आहेत. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडे डिप्लोमा, डिग्री कॉलेजचे प्रस्ताव आले आहेत. हे प्रस्ताव मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने अद्याप फार्मसीचे प्रवेश सुरू झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, यापूर्वी प्रवेशासाठी २८ ऑक्टोबरपर्यंत असलेली मुदत आता १२ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली.

शहरात १७ महाविद्यालयांत डी.फार्मसी तर १५ महाविद्यालयांत बी.फार्मसी अभ्यासक्रम आहे. ७ महाविद्यालयांत एम.फार्म व संशोधनाची सोय आहे. डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म डी) अभ्यासक्रम ४ महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामध्ये फार्मसिस्टने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांचा फार्मसीकडे कल वाढला आहे. त्यामुळेच, शहरात ‘बी फार्मसी’, ‘फार्म डी’साठी १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २० हजारांपेक्षा अधिक ‘डी फार्मसी’ साठी नोंदणी झाली आहे. पण, त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. आता १२ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. १४ नोव्हेंबरला अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन १५ ते १७ नोव्हेंबर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी १९ नोव्हेंबरला जाहीर होईल.

६ नोव्हेंबरला गुणवत्ता यादी

शहरातील १७ महाविद्यालयांत डिप्लोमा इन फार्मसीची (डी फार्मसी) १ हजार २० इतकी प्रवेश क्षमता आहे. आतापर्यंत २० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून अजून ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. २ नोव्हेंबरला अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. तर ३ ते ५ नोव्हेंबरला आक्षेप नोंदणी आणि ६ नोव्हेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.

‘काही फार्मसी महाविद्यालयांची फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) तर्फे केली जाणारी संलग्नता प्रक्रिया रखडल्यामुळे २०२२-२३ ची फार्मसी प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडत चालली आहे. प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे येणारे शैक्षणिक वर्ष खूप कमी कालावधीचे होईल. ते विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक असेल. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठांनी या वर्षातील दोन्ही सत्र पूर्ण करण्यासाठी पुरेसा कालावधी देणे आवश्यक आहे.’

- डॉ. सोहन चितलांगे, प्राचार्य डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, पिंपरी

आकडे बोलतात

अभ्यासक्रम प्रकार - फार्मसी महाविद्यालय संख्या - प्रवेश क्षमता

- फार्म डी - ४ - २०

- डी फार्मसी - १७ - १०२०

- बी. फार्मसी - १५ - ११००

- एम. फार्मसी - ९ - २८५