‘भावी नगरसेवका’च्या सावधपणे ऐका हाका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भावी नगरसेवका’च्या
सावधपणे ऐका हाका
‘भावी नगरसेवका’च्या सावधपणे ऐका हाका

‘भावी नगरसेवका’च्या सावधपणे ऐका हाका

sakal_logo
By

साधा आणि सरळमार्गी अशी योगेशची ओळख होती. त्याचं आयुष्यही सुखा- समाधानानं चाललं होतं. प्रिंटिंग व्यवसायातही त्याचा जम बसला होता. स्मितासारखी मनमिळाऊ स्वभावाची त्याला बायको लाभली होती. सोन्यासारखी दोन मुलेही त्याला होती. दृष्ट लागावी, असं त्याचं सगळं चांगलं चाललं होतं. आपला व्यवसाय सांभाळून तो समाजकार्य करायचा. आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या लोकांची मोफत कामे करायचा. कोणाच्या अडीअडीचणीला धावून जायचा. कोणावर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळण्यासाठी झटायचा. प्रसिद्धीपासून दूर राहून, कोणाकडून कसलीही अपेक्षा न बाळगता त्याचं समाजकार्य जोमात होतं. यातून त्याला मानसिक समाधानही मिळायचं. त्यामुळं तो नेहमी खूष असायचा. मात्र, एकेदिवशी कोणीतरी त्याला ‘भावी नगरसेवक’ अशी हाक मारली आणि त्याचं सारं आयुष्यच बदलून गेलं.
‘‘तुझ्यासारख्या हुशार, कार्यक्षम आणि निःस्वार्थी नगरसेवकाची आपल्या शहराला गरज आहे. तू फक्त निवडणुकीला उभा राहा. बाकीचे आम्ही सगळं बघतो.’’ असं तीन- चार जणांनी त्याला म्हटल्यावर योगेश हवेत तरंगू लागला.
‘‘अरे पण निवडणुकीचा खर्च खूप असतो. माझ्यासारख्यानं एवढे पैसे कोठून आणायचे?’’ असा प्रश्‍न योगेशने विचारल्यावर दोघा- तिघांनी त्याची समजूत काढली.
‘‘तू फक्त उमेदवारी अर्ज भरायचा. बाकीचं सगळं आम्ही बघणार. निवडून आल्यानंतर गोर- गरिबांची सेवा अजून जोमात करायची, एवढं लक्षात ठेव.’’ दुसऱ्या एका मित्राने असं म्हटल्यावर योगेशच्या अंगावर मूठभर मांस चढलं. मग त्याने त्याच्या सगळ्या मित्रांना हॉटेलवर जोरात पार्टी दिली. महागडी दारू दिली. आख्खी रात्र मित्रांनी जागवली.
‘‘योगेश, तूच भावी नगरसेवक ! आम्ही फक्त तुझे कार्यकर्ते. तू फक्त आम्हाला हुकूम सोडायचा. आम्ही त्याची अंमलबजावणी करायची.’’ एक मित्र चढ्या आवाजात बोलला. ‘‘बरं आम्हाला ‘मटण फ्राय’च्या चार प्लेट आणून दे.’’ असं म्हणून त्यानेच योगेशला वेटर समजून आॅर्डर दिली. एक मिनिटापूर्वी ‘तू फक्त हुकूम सोडायचा’ असं म्हणणाऱ्यानेच त्याला आॅर्डर सोडली होती. योगेशनेही ती पाळली. त्यानंतर मात्र हे नेहमीचं झालं. ‘भावी नगरसेवक’ हा परवलीचा शब्द वापरल्यावर मित्रमंडळी व कार्यकर्ते योगेशकडून वेगवेगळ्या धाब्यावर ओल्या पार्ट्या घेऊ लागले. मित्रमंडळी व कार्यकर्त्यांच्या मदतीने वॉर्डमध्ये कार्यक्रम घेऊ लागला. त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होऊ लागला. या सगळ्यामुळे त्याचे व्यवसाय व घराकडे दुर्लक्ष होऊ लागले. स्मिता व त्याची सारखी भांडणे होऊ लागली. योगेशचं सारं जीवनच बदलून गेलं. चोवीस तास तो ‘मला इथं एवढं मतदान होईल, तिथं तेवढं होईल’ अशा बेरजा करू लागला. नगरसेवक झाल्यानंतर काय करायचं, याचे आडाखे बांधू लागला. ‘तू फक्त उमेदवारी अर्ज भरायचा, बाकी सगळं आम्ही बघतो’ असं निवडणुकीआधी म्हणणाऱ्या लोकांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत आपला शब्द फिरवला. ‘‘येथे एवढे पैसे टाक, तिथं एवढा खर्च कर.’’ असा सल्ला ते योगेशला देऊ लागले आणि योगेशही सढळ हाताने खर्च करायला लागला. निवडणुकीत मात्र योगेशचं डिपॉझिटही जप्त झालं. निवडणुकीमुळे त्याच्यावर कर्जही झालं. त्यामुळे काही दिवसांनी त्याला हॉटेलही विकावं लागलं. आता त्याच हॉटेलसमोर त्याने पानाची टपरी टाकलीय. सगळ्यांनी त्याला ‘चुना’ लावल्यावर आता तो दुसऱ्यांच्या पानांना निमूटपणे ‘चुना लावतोय’. तुम्हाला कोणी ‘भावी नगरसेवक’ म्हणून हाक मारत नाही ना? मारत असेल तर सावध राहा. नाहीतर तुम्हालाही ‘चुना’ लागू शकतो.