रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा
रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा

रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः रस्त्याच्या कडेची आणि पदपथावरील अतिक्रमणे काढावेत. विद्युत खांब, उद्यानांमध्ये अनधिकृतपणे लावण्यात आलेले फ्लेक्स तातडीने काढण्यात यावेत. अनधिकृतपणे फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करावी. पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करावा. नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त कराव्यात, अशा सूचना व तक्रारी जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी मांडल्या.
महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नुकतीच जनसंवाद सभा पार पडली. या सभेत ४७ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रार वजा सूचना मांडल्या. तक्रारदार म्हणाले, ‘‘कचरा संकलित करण्यासाठी येणाऱ्या घंटागाड्या नियमित येतील, याची दक्षता घ्यावी. उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, रस्त्यांचे काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी, पदपथांवरील राडारोडा उचलावा, सार्वजनिक शौचालयांमधील बंद असलेले दिवे बदलावेत. रस्त्याच्या मध्यभागी, गतिरोधक आणि पदपथांवरील निघालेले पेव्हिंग ब्लॉक तत्काळ बसवावेत, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे. रस्त्याच्या पातळीपासून खोल गेलेले चेंबर व फुटलेल्या जलनिस्सारण वाहिन्या लवकर दुरुस्त कराव्यात, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.’’
नियोजन कौतुकास्पद
शहरात वर्दळीच्या ठिकाणी व अरुंद रस्त्यांवर फायर फायटर मोटार सायकलीद्वारे करण्यात आलेल्या पेट्रोलिंगमुळे शहरात घडलेल्या आगीच्या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. तसेच शहरातील नदी घाटांची पाहणी करून त्याठिकाणी तैनात करण्यात आलेले आपत्ती व्यवस्थापन पथक आणि उपलब्ध करून देण्यात आलेली स्वच्छता, निर्माल्य कुंड आदींमुळे दिवाळी आणि छटपूजेचा सण उत्साहात पार पडण्यास मदत झाली, अशा भावनाही नागरिकांनी सभेमध्ये व्यक्त केली.