फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेरीवाल्यांचे  सर्वेक्षण सुरु
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरु

फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरु

sakal_logo
By

पिंपरी, ता.१ ः महापालिकेच्यावतीने शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण आजपासून (ता.१) ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण विनामूल्य तसेच बायोमेट्रिक पद्धतीने होणार आहे. नोंदणी व सर्वेक्षण सुलभ पद्धतीने होण्यासाठी संबंधित फेरीवाल्यांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकास आधारकार्ड लिंक (संलग्न) करून या सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
शहरातील पथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी हे सर्वेक्षण शासनाने विकसित केलेल्या हॉकर्स अॅपच्या माध्यमातून बायोमेट्रीक पद्धतीने करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण ऑनलाइन असल्यामुळे सर्वेक्षणावेळी मोबाईल संबंधित फेरीवाल्यांच्या क्रमांकावर आलेला ओटीपी महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वेक्षण करण्यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
ही आहेत आवश्‍यक कागदपत्र
फेरीवाला सर्वेक्षणासाठी संबंधित फेरीवाल्यांकडे आधारकार्डची छायांकित प्रत, रेशनकार्डचे पहिले पान व शेवटचे पान यांची एका पानावरील छायांकित प्रत असणे अनिवार्य आहे. जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत स्वतःजवळ असावी. दिव्यांग, घटस्फोटित, परित्यक्त्या महिलांसाठी आनुषंगिक पुराव्याची प्रत असणे गरजेचे आहे. फेरीवाल्यांना यापूर्वी पथविक्रेता प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्यांनी प्रमाणपत्र सादर करावे. यापूर्वी अतिक्रमण विभागाकडून काही कारवाई झाली असेल तर संबंधित दंडाची पावती सोबत असणे आवश्यक आहे. महापालिकेकडील ‘लेटर ऑफ रेकमंडेशन’ची प्रत किंवा पीएम स्वनिधी कर्ज प्राप्त झाल्याचे कागदपत्र तसेच कोरोना काळात महापालिकेने फेरीवाल्यांना देण्यात आलेला पास आदी कागदपत्रे संबंधित फेरीवाल्यांनी सर्वेक्षणावेळी स्वतःजवळ बाळगणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती फेरीवाल्यांनी सोबत ठेवाव्यात. तसेच आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांकांची संलग्न करून घ्यावा. आधार क्रमांक नसेल तर जवळच्या आधार केंद्रात जाऊन आपली आधार नोंदणी पूर्ण करावी, अशी माहिती भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली.