भटक्या श्वानप्रेमींवर सोशल मीडियावरुन भावनिक ‘जाळे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dog
भटक्या श्वानप्रेमींवर सोशल मीडियावरुन भावनिक ‘जाळे’

भटक्या श्वानप्रेमींवर सोशल मीडियावरुन भावनिक ‘जाळे’

पिंपरी - ‘मी भटक्या श्वानांसाठी दाता शोधत आहे. बरेच श्वान जखमी आहेत. त्यांना वारंवार पशुवैद्यकाकडे नेणे परवडत नाही. कदाचित त्यांचा उपचाराअभावी मृत्यू ओढवू शकतो. त्यासाठी मला ५ ते १० हजार रुपयांची नितांत गरज आहे. मी नोकरी करत असून मला श्वानांचा खर्च परवडणारा नाही. मी तुम्हाला मदत पाठविल्यानंतर प्रत्यक्षात भेटेल.’ अशा पद्धतीचे ‘ट्रस्ट फ्रॉड’चे संदेश सध्या इन्स्टाग्रामवरुन फिरत आहेत. सोशल मीडियावरुन प्राणीप्रेमी म्हणजेच ‘पेट लव्हर्स’ ग्रुप शोधून तरुणांना टार्गेट केले जात असल्याचे समोर आले आहे.

पिंपळे सौदागरमधील ३८ वर्षाच्या तरुणाला इन्स्टाग्रामवरुन अशाच पद्धतीने संदेश आला. त्यानंतर, तरुणाने सावधपणाची भूमिका घेतल्याने फसवणूक टळली होती. त्याने सामाजिक संस्थेच्या नोंदणीची माहिती मागविली. ती माहिती मिळाली नसल्याने हा फ्रॉड प्रकार असल्याचे उजेडात आले. काही दिवसांनी त्या तरुणीने पुन्हा मेसेज केला की, ‘पैसे पाठविल्यानंतर मी तुम्हाला वैयक्तिकरित्या जेवणासाठी भेटेल’. अशा प्रकारच्या संदेशामुळे हा सायबर गुन्ह्याचाच एक प्रकार असल्याचे तरुणाच्या लक्षात आले.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून काही सेवानिवृत्त तसेच सुशिक्षित नागरिकांनी एका संदेशावरून संबंधित बोगस व्यक्तीला २ हजार रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत वैयक्तिक खात्यावर पैसे पाठविल्याचे समोर आले आहे. हा फ्रॉडचा नवीन प्रकार असून प्राणी प्रेमींना अशा प्रकारच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे समोर आले आहे.

‘ट्रस्ट फ्रॉडचा हा प्रकार आहे. सर्वसामान्य नागरिकांना याची कल्पना नाही. ई मेल व मेसेज हे निनावी संवादाचे माध्यम आहे. त्याच्यामागे कोण व्यक्ती आहे? स्त्री आहे की पुरुष ? एखादे सॉफ्टवेअर की आणखी काही ? कधी एनजीओच्या, कधी पंतप्रधानांच्या तर कधी, एलआयसी, बॅंक अशा विविध नावांनी नाना प्रकारे कॉल येतात. नागरिकांनी यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिक कुठे व कोणत्या फ्रॉडमध्ये अडकू शकतात. याचा अभ्यास सायबर चोरट्यांचा आहे. सायबर क्राइमसारखे गुन्हे रोखण्यासाठी एक जग, एक पोलिस संकल्पना राबविणे अत्यावश्यक आहे.’

- डॉ. संजय तुंगार, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस निरीक्षक

‘रस्त्यावरचे भटके श्वान दाखवायचे. नागरिकांची सहानुभूती मिळवायची. असे प्रकार चालू आहेत. ज्यांची कागदपत्रे व वेबसाइट आहेत. त्या संस्था अधिकृत आहेत. त्या अशाप्रकारे फ्रॉड करु शकत नाहीत. जे अशा पद्धतीने मुक्या जनावरांच्या नावाखाली पैसे लुटत आहेत. ते काय प्राण्यांना खायला घालणार? त्यासाठी संस्थेच्या बॅंकेचा तपशील पाहणे गरजेचे आहे. बॅंकेचे अकाउंट हे वैयक्तिक व्यक्तीच्या नावावर असता कामा नये. त्यांचे मागील रेकॉर्ड तपासणे आवश्यक आहे. तसेच महापालिकेचे स्वतंत्र पशुवैद्यकीय विभाग असल्याने कोणताही खर्च उपचारासाठी येत नाही. यामध्ये बरेच नागरिक अडकत आहेत. प्राण्यांच्या नावाखाली अशा प्रकारे पैसे उकळणे ही एक दिवसाढवळ्या शुद्ध फसवणूक झाली आहे.’

- अभिजीत पाटील, वन्यजीव अभ्यासक, निगडी प्राधिकरण

‘नागरिकांनी स्वत: जाऊन श्वानांची ठिकाणे पाहणे गरजेचे आहे. ॲनिमल कम्युनिटी शहरात मोठ्या प्रमाणात आहे. एक लाखाच्यावर फॉलोअर्स आहेत. त्यापलीकडेही कोणी वैयक्तिक स्तरावर जाऊन प्राण्यांसाठी खूप चांगले काम करत असेल तर त्यासाठी डोनेशन द्यायला हवं. परंतु, काही ठराविक फ्रॉड व्यक्तींमुळे संस्थांना डोनेशन मिळणे अवघड होता कामा नये.’

- पुनीत खन्ना, पीपल्स फॉर ॲनिमल्स, सामाजिक संस्था, अध्यक्ष