कचऱ्याबाबत ‘कर्णकर्कश’ जागरूती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचऱ्याबाबत ‘कर्णकर्कश’ जागरूती
कचऱ्याबाबत ‘कर्णकर्कश’ जागरूती

कचऱ्याबाबत ‘कर्णकर्कश’ जागरूती

sakal_logo
By

पिंपरी, ता.२ ः ‘स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने’, ‘ओला सुका कचरा विलगीकरण करू या’ असा स्वच्छतेचा पुकारा कचरा गाड्यांवरील कर्णकर्कश ध्वनीक्षेपकाव्दारे महापालिका देत आहे. कानाला दडे बसणाऱ्या या आवाजाने नागरिक पुरते वैतागले आहेत. तर गाड्यांचे काही चालक कर्णबधीर झाले आहेत. मात्र ही तक्रार आरोग्य विभागाला ‘ऐकायलाच येत नाही’ असा आरोप नागरिकांचा आहे. ध्वनीप्रदूषणाचे तीनतेरा वाजविणारे हे ध्वनिक्षेपक बंद करावेत अशी मागणी होत आहे.

शहरातील कचरा उचलण्याबाबत महापालिकेने ए. जी. एन्‍वायरो इन्फा प्रोजेक्ट आणि बीव्हीजी यांना ठेका दिला आहे. महापालिकेने या गाड्यांवरून जागरूकता करण्याचा संकल्प केला. आता कर्णकर्कश ध्वनिक्षेपकाची ही वाहने सकाळी साडेसहापासून सुसाट आहेत. या आवाजामुळे शाळा, महाविद्यालय व दवाखाने, तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होत आहे.

सुमारे २५५ गाड्यांवर ‘स्वच्छ भारताचा’ नारा देणारी गाणी मुळात बेसूर आहेत. या ऑडिओ क्लिप पंधरा ते तीस मिनीटांच्या आहेत. एका गाडीच्या दिवसभरात चार ते सहा फेऱ्या होतात. पहाटेपासून सुरू होणाऱ्या फेऱ्या दुपारपर्यंत सुरूच असतात. सोबत ध्वनीक्षेपकही सुरूच असतो. साहजिकच सकाळच्या प्रसन्न वातावरणात किंवा दुपारी विश्रांतीच्या वेळेत हा आवाज त्रास देणारा ठरतो. त्यामुळे नागरिकांची चिडचिड वाढते. ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार रहिवासी भागात ४० डेसिबलपेक्षा अधिक आवाज धोकादायक पातळीवर असतो. याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी आरोग्य विभागाकडे केल्या आहेत. मात्र, त्याची कोणतीही दखल घेत नसल्याचे चित्र आहे. दिवसभर कानावर एकसारखा आवाज पडत असल्याने नागरिक वैतागले आहेत.

शाळा, रुग्णालयाजवळही आवाज
ही गाणी बंद करण्याची मागणी करत कर्णकर्कश आवाज कमी करण्याची मागणी शिक्षण संस्था, डॉक्टरांनी केली आहे. वास्तविक येथे मोठ्या आवाजास मनाई असते. कारण रुग्ण व विद्यार्थ्यांना त्रास होत असतो. रहाटणी, काळेवाडी, निगडी, चिंचवडगाव यात सर्वाधिक कचरा गाड्या आहेत.

आरोग्य विभाग अनभिज्ञ
महापालिकेने शहराचा कचरा उचलण्याबाबत किती कंपन्यांना काम दिले आहे. किती वाहनांमधून कचरा संकलित केला जातो. त्यांची संख्या किती आहे. याविषयी आरोग्य विभागाकडे माहितीच नसल्याचे माहिती समोर आले आहे. काही अधिकारी फोन उचलत नाहीत. काहींना काहीही माहिती नाही. यावरून कचरा संकलित करण्यात काही गौडबंगाल तर नाही ना असा प्रश्‍न निर्माण होत आहे.
--
असे आहे गाणे
‘‘स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से ये अपने वादा ,ये वादा कर लिया हमने. हमसे निकलेगी स्वच्छता कि एक नदी, सोचता हे ये जल-जल. कल कल. एक धुलीसी जिंदगी, स्वच्छता की ज्योत लेकर घर घर जायेंगे. साफसुथरी रोषणाई मे नहायेंगे. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने. हर गली अब निकलेगा उजियाला उन्नती की राहपर. अंगण -अंगण आशा गाएंगी. गांधीजींका सपना साकार करना है. खुद से ही करनी होगी शुरूवात. कोना कोना जागरूक करना पडेगा. जाग उठेगा भाग्य हमारा. स्वच्छ होगा ये भारत हमारा... ’’

कोट
‘शहरात किती वाहने आहेत, याची माहिती घेउन सांगतो. वाहनांवरील भोग्यांचा आवाज किती डेसिबल आहे. याविषयी माहिती नाही. संबंधित सहाय्यत आरोग्य अधिकारी आपणास माहिती देतील.’
-अजय चारठाणकर, उपायुक्त, आरोग्य विभाग

PNE22T02513
NE22T02512