राष्ट्रीय पॅरा जलतरणपटू चैतन्य कुलकर्णीला जेवणाची भ्रांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय पॅरा जलतरणपटू चैतन्य कुलकर्णीला जेवणाची भ्रांत
राष्ट्रीय पॅरा जलतरणपटू चैतन्य कुलकर्णीला जेवणाची भ्रांत

राष्ट्रीय पॅरा जलतरणपटू चैतन्य कुलकर्णीला जेवणाची भ्रांत

sakal_logo
By

बेलाजी पात्रे

वाकड, ता. २ : सलग दोन वेळा राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या तसेच गुवाहाटी (आसाम) येथील २२ व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय पॅरा जलतरणपटू चैतन्य कुलकर्णी याला एक वेळच्या जेवणाची भ्रांत असल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. वडील आणि मोठ्या भावाकडून होणारी मदत तुटपुंजी ठरत आहे.
नगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा चैतन्य बालेवाडी-म्हाळुंगेतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात गेल्या दीड वर्षांपासून सराव करतो. तो नगर जिल्ह्यातील राहता दाढचा (बुद्रुक) असून २०१४ मध्ये द्वितीय वर्षाला असताना एका अपघातात त्याने दोनही पाय गमावले. अंगणातील नारळाच्या झाडावर तो नारळ काढण्यासाठी चढला आणि तोल गेल्याने ४० फूट उंचीवरून खाली आपटला. त्याच्या हाताला जबर मार बसला. तर कंबरेपासून दोनही पाय निकामी झाले. बऱ्याच शस्त्रक्रिया आणि प्रयत्नांनी डॉक्टरांना त्याचे हात पूर्ववत करण्यात यश आले. मात्र, चैतन्यला दोनही पायांना कायमचे ७५ टक्के अस्थिव्यंगत्व आले. तो कुबडीच्या आधारे चालतो. परंतु, खचून न जाता २०१८ पासून आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुयश जाधव याच्या मार्गदर्शनाखाली त्याने जलतरणचा सराव सुरु केला. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची असून वडील पानपट्टी चालवितात. मोठा भाऊ पडेल ते काम करतो. दोघांच्या तुटपुंज्या उत्पन्नातून महिन्याकाठी मुश्किलीने पाच ते सहा हजार रुपये चैतन्यच्या सराव व खानपानासाठी मिळतात. मात्र, एवढ्या पैशात तो सराव आणि एक वेळचेच जेवण भागवू शकतो.
चैतन्य याने गेल्या आठवड्यात क्रीडा आयुक्तांना पत्र लिहून मी आपल्या क्रीडा संकुलात सराव करत असून सराव झाल्यानंतर मला डाएट फूड व फळे यांची कमतरता भासते. त्यामुळे, गरजेचा आहार संकुलाच्या कँटीनमध्ये देण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती त्याने केली होती. मात्र, क्रीडा प्रबोधनीतील खेळाडूंव्यतिरिक्त इतर खेळाडूंना विनाशुल्क जेवण उपलब्ध करून देण्याची शासकीय योजना नसल्याचे कारण देत त्याची मागणी धुडकाविण्यात आली.

‘‘शिवछत्रपती क्रीडा संकुलात खूप सारे खेळाडू वेगवेगळ्या खेळांचा सराव करतात. त्यामुळे, नियमाला सोडून एखादी गोष्ट केल्यास अन्य सर्व खेळाडू अशा स्वरूपाची मदत मागतील. मात्र, चैतन्य या जलतरणपटूबाबत काय करता येईल ? याची माहिती घेऊन व्यक्तिगत पातळीवर किंवा विशेष बाब म्हणून मदत करण्याचा नक्की प्रयत्न केले जातील.’’ - सुहास दिवसे, क्रीडा आयुक्त