बेताल अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेताल अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करा
बेताल अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करा

बेताल अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ ः ‘‘राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील मंत्र्यांची सातत्याने बेताल आणि बेजबाबदार वक्तव्ये सुरू असून, तमाम महिलांचा अवमान या मंत्र्यांकडून केला जात आहे. सुप्रिया सुळे यांच्यासारख्या संसदरत्नाबद्दल अब्दुल सत्तार यांनी केलेली वक्तव्ये ही अत्यंत निंदनिय आणि निषेधार्ह आहेत. सत्तार यांनी केवळ माफी मागून चालणार नसून, त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदमुक्त केले पाहिजे,’’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सोमवारी केली.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत मत प्रदर्शित करताना अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरली होती. त्याचा निषेध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या वतीने पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अजित गव्हाणे बोलत होते.
गव्हाणे म्हणाले, ‘‘खोके घेऊन स्वत:च्या पक्षाची गद्दारी करून मंत्री झाले आहेत. पैसा आणि सत्तेच्या जोरावर त्यांची सध्या बेताल वक्तव्ये सुरू आहे. केवळ माफी मागून चालणार नाही. अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरणाऱ्या सत्तार यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असून, सत्तारांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविली जार्ईल.’’
कविता आल्हाट म्हणाल्या, ‘‘सत्तार यांच्या खोक्याची कीर्ती राज्यभर पसरली आहे. सुसंस्कृती महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री करीत आहेत. त्यांना आगामी निवडणुकीत जनता धडा शिकवेल.’’
यावेळी झालेल्या आंदोलनात माजी नगरसेविका शमीम पठाण, माजी नगरसेवक मयूर कलाटे, प्रवीण भालेकर, प्रसाद शेट्टी, संतोष बारणे, धनंजय भालेकर, मीरा कुदळे, प्रफुल्ल महोत्सलिंग, अनंत सुपेकर, ऋषिकेश शिंदे, झीनत इनामदार, उत्तम कांबळे, तुषार ताम्हाणे, मंगेश खंडागळे, दीपक गुप्ता, ओम क्षीरसागर, विजय दळवी यांच्यासह अनेक महिला व पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते.