पिंपरी-चिंचवड शहरात पाणीपुरवठा दररोज करण्यात यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water supply
‘शहरात पाणीपुरवठा दररोज करण्यात यावा’

पिंपरी-चिंचवड शहरात पाणीपुरवठा दररोज करण्यात यावा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही चांगला पाऊस होऊन पवना धरण तुडुंब भरलेले असूनही शहरात दररोज तीन तास पाणीपुरवठा का केला जात नाही. हे मोठे षडयंत्र आहे, असा आरोप करत शहरात पुन्हा पूर्वीप्रमाणे दररोज पाणी पुरवठा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. सचिन गोडांबे यांनी आयुक्त राजेश सिंह यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड मध्ये ऑक्टोबर २०१९ पर्यंत दररोज तीन तास पाणीपुरवठा होत होता. परंतु नोव्हेंबर २०१९ मध्ये अचानक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला व सहा तासांऐवजी पाच तासच पाणीपुरवठा होऊ लागला आहे. ज्यात कधीकधी आणखी कपात होऊन साडेचार तासच पाणी सोडले जात आहे. मोठ्या सोसायट्यांची दरमहा लाखो रुपयांची बिले टँकरवर निघतात. हे टँकर माफिया लॉबी व भ्रष्ट वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या मिलीभगत शिवाय पाण्यासारख्या मूलभूत गरजेच्या गोष्टीबाबत पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांवर इतका अन्याय होणे शक्यच नाही, असा आरोप त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

लोकप्रतिनिधीही याबाबत गप्प - ॲड. गोडांबे

नुकतेच १९ ऑक्टोबरला उच्च न्यायालयाने पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागातील कमी पाणी पुरवठ्याबाबत २९ नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. यावरूनही या प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात यावे. टँकर माफियांना पोसण्यासाठी व सोसायट्यांकडून दररोज लाखो रुपये लुटण्यासाठी पाणीपुरवठा वरिष्ठ अधिकारी मिलिभगत करून जनतेच्या पैशांवर दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहेत. लोकप्रतिनिधीही याबाबत गप्प आहेत, असे ॲड. गोडांबे यांनी निवेदनात म्हटले आहे.