डीपी’ला धोका कचऱ्याच्या आगीचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीपी’ला धोका कचऱ्याच्या आगीचा
डीपी’ला धोका कचऱ्याच्या आगीचा

डीपी’ला धोका कचऱ्याच्या आगीचा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ ः महावितरणच्या ‘डीपी’खाली (छोटे रोहित्र) पडलेले भंगार... उघड्या वायरिंगवर टाकण्यात येणारा कचरा... एवढे कमी की काय, म्हणून गाड्यांच्या पार्किंगसाठी ‘डीपी’चा घेतलेला आधार... असे चित्र सध्या शहरात आहे. शहरात कचरा जाळण्याचे प्रकार नियमित होत असल्याने महावितरणच्या ‘डीपी’खाली पडलेला कचरा धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निमित्ताने मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण दिले जात आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता.११) मासुळकर कॉलनीतील ‘डब्ल्यु’ सेक्टरमधील ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यामुळे ही बाब समोर आली आहे. पिंपरी-मासुळकर कॉलनीतील ‘डब्ल्यु’ सेक्टरमधील ट्रान्सफॉर्मरला शुक्रवारी (ता.११) दुपारी १.२८ वाजता आग लागली. या ‘डीपी’खाली असलेल्या कचऱ्यामुळे ही आग वेगाने पसरली. महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे एक अग्निशामक घटनास्थळी आग विझविण्यासाठी पोहचले होते. अखेर अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणेपर्यंत संबंधित डीपी जळून खाक झाला. नशिबाने विद्युत खांबाली आग लागली नाही, अन्यथा भीषण आगीचा प्रकार घडला असता, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले. आगीच्‍या घटनेमुळे मासुळकर कॉलनीमधील ‘डब्ल्यु’ सेक्टर, व्ही सेक्टर आणि टी सेक्टर परिसरातील विद्युत पुरवठा रात्री १० वाजेपर्यंत खंडित झाला होता. दरम्यान, या घटनेमुळे ‘डीपी’खाली पडलेला कचरा व भंगार साहित्य हे धोकादायक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु त्यानंतरही हा पडलेला कचरा उचलण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला नाही. तर, महावितरणनेदेखील या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा ‘डीपी’मध्ये शॉर्टसर्किट झाल्यानंतर परिसरात आग लागण्याची शक्यता कायम आहे. दरम्यान, डीपी खाली कचरा जाळू नका, असे महावितरण विभागाकडून वेळोवेळी नागरीकांना आवाहन करण्यात येते. परंतु नागरिकांकडून ट्रान्सफॉर्मर, डीपी आणि विद्युत खांबांखाली कचरा जाळण्याची कृती नागरिक करत असल्याचे दिसून येत आहे.