पिंपरी कार्तिकी वारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी कार्तिकी वारी
पिंपरी कार्तिकी वारी

पिंपरी कार्तिकी वारी

sakal_logo
By

उद्योगनगरीला
कार्तिकीचे वेध

कोरोनानंतर दोन वर्षांनी भरणाऱ्या वारीबाबत कमालीचा उत्साह

पिंपरी, ता. १४ ः आळंदीतील कार्तिकी वारी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी दिन सोहळा. त्यामुळे पंचक्रोशीतील मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी, दिघी, भोसरी या उद्योगनगरीतील उपनगर परिसरात वारीमय वातावरण असते. या गावांमध्येही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांचा निवास असतो. भजन, कीर्तन, जागर, हरिनामाचा गजर सुरू असतो. अन्नदान व निवास व्यवस्थेच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा केली जाते. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे आळंदी वारी अर्थात कार्तिकी यात्रा फार अशी भरली नव्हती. यंदा सर्व ‘अनलॉक’ आहे. त्यामुळे आठ दिवसांवर आलेल्या वारीसाठी आतापासूनच वारकरी येऊ लागले आहेत. विविध दुकाने थाटू लागली आहेत. उद्योगनगरीतील भाविकांनाही वारीचे वेध लागले आहेत.

वारीचे माहात्म्य
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला संजीवन समाधी घेतली. त्यानिमित्ताने दरवर्षी कार्तिक महिन्यात आळंदी येथे यात्रा भरते. संतांचे सानिध्य लाभलेल्या देशातील तीर्थक्षेत्रांपैकी सर्वांत मोठी यात्रा म्हणून कार्तिक वारीचा लौकिक आहे. कार्तिक वद्य अष्टमी ते त्रयोदशी असा सहा दिवसांचा यात्रा कालावधी आहे. यातील एकादशी ते त्रयोदशी असे तीन दिसत महत्त्वाचे मानले जातात.

संत नामदेवांची पालखी
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी दरवर्षी पंढरपूरहून संत नामदेव महाराज यांची पालखी आळंदीत दाखल होत असते. त्यांच्या वंशजांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन संजीवन समाधी दिनी अर्थात कार्तिक वद्य त्रयोदशीला माऊलींच्या मंदिरात होते. आषाढी वारीनिमित्त माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याइतकेच महत्त्व कार्तिकी वारीला आहे. आळंदीतील सर्वात मोठा सोहळा असतो.

त्रिपुरारीनंतर आळंदीची वाट
त्रिपुरारी पौर्णिमेला काकड आरती सोहळ्याची सांगता होते. पंढरपूर यात्रा संपते. त्यानंतर वारकरी, व्यापारी, खेळणीवाले आळंदीची वाट धरतात. राज्यातील अनेक दिंड्या येतात. इंद्रायणी नदी काठ फुलून जातो. पंचक्रोशीतील चऱ्होली, धोनोरे, केडगाव, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, दिघी, भोसरी परिसरातील मोकळ्या जागांमध्ये राहुट्या टाकून वारकरी राहतात. स्थानिक भाविक त्यांची निवास व अन्नदानाची व्यवस्था करतात.

चऱ्होली, मोशीतून ‘नो-एंट्री’
आळंदी यात्रा काळात देहू-आळंदी रस्त्यावरील मोशी येथील वाय जंक्शन येथून आणि पुणे-आळंदी पालखी मार्गावरील चऱ्होली फाटा येथून आळंदीकडे जाणारी वाहतूक बंद केली जाते. पीएमपी बस सेवा व वारकऱ्यांची वाहने अनुक्रमे डुडुळगाव व शासकीय विश्रामगृहापर्यंतच सोडली जातात. कारण, या भागात दिंड्यांचा मुक्काम राहात असून रात्रभर वारकऱ्यांची वर्दळ असते. या दोन्ही ठिकाणांपासून मंदिरापर्यंत चालतच जावे लागते.

कोकण दिंड्यांची संख्या अधिक
आळंदीत होणाऱ्या कार्तिकी वारीला कोकण भागातून मोठ्या प्रमाणात वारकरी पायी दिंडी सोहळ्याने येतात. त्यामुळे त्यांचा प्रवास हा बोरघाटमार्गे होतो. खंडाळा घाटातून वर आल्यानंतर मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच टाळगाव-चिखली, मोशी या भागातही मोठ्या प्रमाणात दिंड्या मुक्कामी तसेच विसाव्याला असतात. त्यामुळे या भागातील नागरिक वारकऱ्यांना निरनिराळ्या सेवासुविधा उपलब्ध करून देतात.

कार्तिकी यात्रा आळंदीची असली तरी निम्मे यात्रा व वारकरी चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी, डुडुळगाव भागात असतात. त्यांच्या राहण्याची व्यवस्था व विविध प्रकारची सेवा स्थानिकांकडून केली जाते. गेल्या वर्षी पाऊस आला त्यावेळी चऱ्होलीतील वाघेश्वर
मंदिर व धर्मशाळेत दिंड्याची निवास व्यवस्था केली होती. कोणत्याही प्रकारची उणीव वारकऱ्यांना भासू दिली जात नाही. आमच्यासाठी तेच ‘माउली’ असतात.
- ज्ञानेश्वर ऊर्फ काळुराम पठारे, अध्यक्ष, वाघेश्वर मंदिर ट्रस्ट, चऱ्होली बुद्रुक

आम्ही दरवर्षी कार्तिकी वारीला आळंदीत येत असतो. त्यावेळी आमचा मुक्काम इंद्रायणीनगरला असतो. आम्ही चार-पाच गावांतील वारकरी एकत्रितपणे येतो. त्यामुळे दररोज एका गावातील मंडळींकडून अन्नदान केले जाते. स्थानिक रहिवाशांचे चांगले सहकार्य मिळते. अनेक जण अन्नदान करतात. माउलींचे दर्शन होते आणि संतांच्या भूमीत येऊन हरिनामाचा गजर केला जातो. श्रवणभक्तीचाही आनंद मिळतो.
- धनराज शेळके, वारकरी, रा. पाळधी, ता. जामनेर, जि. जळगाव

----------
ग्राफिक नंबर शटर स्टॉक
१९१९९६०९९६
१७५६१७२८४९
(लेआउट झाल्यानंतर शटरस्टॉक फायनल फोटो देतो)