रखडलेले पुनर्वसन ः भोसरी एमआयडीसीत सोळा वर्षापासून ३०६ गाळे पडून गाळे अडकले लाल फितीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रखडलेले पुनर्वसन ः भोसरी एमआयडीसीत सोळा वर्षापासून ३०६ गाळे पडून  
गाळे अडकले लाल फितीत
रखडलेले पुनर्वसन ः भोसरी एमआयडीसीत सोळा वर्षापासून ३०६ गाळे पडून गाळे अडकले लाल फितीत

रखडलेले पुनर्वसन ः भोसरी एमआयडीसीत सोळा वर्षापासून ३०६ गाळे पडून गाळे अडकले लाल फितीत

sakal_logo
By

जयंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. १५ : भोसरी औद्योगिक वसाहतीमधील टी ब्लॉक-२०१ मध्ये आमचा स्वत:चा गाळा १० ते १२ वर्षांपूर्वी झाला असता तर; आमची खूप प्रगती झाली असती. नवीन मशिन घेण्याकरीता कर्ज घेण्यासाठी सुविधा मिळाली असती. शेवटी मी आता वैतागून तळवडे येथे ५ हजार चौरस फुटाचे शेड भाड्याने घेतले आहे. ही व्यथा आहे सूक्ष्म लघुउद्योजक सुमीत सुरेश हरगापूरकर यांची.

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत रहिवासी भागातील सूक्ष्म लघुउद्योजकांचे पुनर्वसन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने २००६ मध्ये भोसरी औद्योगिक (एमआयडीसी) क्षेत्रातील ‘टी’ ब्लॉक-२०१ येथे औद्योगिक गाळे बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला. परंतु; लालफितीच्या कारभारामुळे आजपर्यंत केवळ ८५ टक्के काम झाले आहे. त्यामुळे हे ३०६ गाळे पडून आहेत.
महापालिकेने २००६ मध्ये निविदा काढून, ३०६ गाळ्यांचा मोठा प्रकल्प सुरु केला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) १९९४-९५ मध्ये आठ एकर जागा महापालिकेकडे वर्ग केली होती. सुरवातीला महापालिका ९९ वर्षांच्या भाडे करारावर हे गाळे उद्योजकांना देणार होती.

तरतुदीअभावी प्रकल्प रखडला
महापालिकेने मोठ्या उत्साहाने सूक्ष्म उद्योगांच्या पुनर्वसनाची हा प्रकल्प सुरु केला. परंतु; त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद केली नाही. २००८ मध्ये या प्रकल्पाच्या कामाचे आदेश काढले. महापालिकेची आर्थिक परिस्थिती २००८-२००९ या काळात बिकट असल्याने पुन्हा अन्य नागरी सुविधांच्या महत्त्वाच्या कामांकडे तरतूद वळविण्यात आली. त्यामुळे वारंवार काम मागे पडत गेले. आताही वर्गीकरण करून पायाभूत सुविधांच्या राहिलेल्या कामासाठी या वर्षी सुमारे दीड कोटींची तरतूद केली आहे. ही तरतूद डिसेंबरपर्यंत पुरेल पुन्हा दीड-दोन कोटींची तरतूद करावी लागले, असे या प्रकल्पाचे काम पाहणारे उपअभियंता जयकुमार गुजर यांनी सांगितले.

आकडे बोलतात...

१) या गाळ्यांसाठी २००६ मध्ये सुमारे १८० सूक्ष्म उद्योजकांनी प्रत्येकी ५ हजार रुपये भरले.
२) २०१२ मध्ये याच उद्योजकांनी पुन्हा प्रत्येकी २५ हजार रुपये भरले.
३) महापालिकेकडे ५४ लाख रुपये १० वर्षांपासून जमा आहेत.
४) गाळे दहा- बारा वर्षांपूर्वी मिळाले असते तर एका गाळ्यातून महिन्याला सुमारे १० लाख रुपये उलाढाल झाली असती.
५) ३६० गाळ्यातून सुमारे ३० कोटी ६० लाख रुपयांची उलाढाल अपेक्षित होती.
६) वर्षाला ३६७ कोटी रुपयांची उलाढाल झाली असती.
७) गाळे वेळेवर न मिळाल्यामुळे सुमारे ३ हजार ६७२ कोटी रुपयांची उद्योगनगरीतील उलाढाल बुडाली.

कामगारांचा रोजगार बुडला!
सूक्ष्म उद्योगांमध्ये किती मशिन आहेत, त्यावर तेथे किती कामगार काम करू शकतात. याचे गणित अवलंबून असते. तरीही यात कमीत कमी ३२५ चौरस फुटाच्या गाळ्यात १० कामगार व ६५० चौरस फुटाच्या गाळ्यात २० कामगारांनी काम केले असते. त्यामुळे या ३०६ गाळ्यात सरासरी ३ हजार ते ६ हजार कामगारांना काम मिळाले असते.

‘‘महापालिकेचा मोठा खर्च झाल्याने सध्याच्या बाजारभावाप्रमाणे भाडे घ्यावे, अशी महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाची मागणी आहे. याला आमचा विरोध आहे. ५ हजार रुपये भरलेल्या उद्योजकांना १५ रुपये प्रति चौरस फूट दराने गाळे मिळावेत.’’
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना.

‘‘या प्रकल्पातील गाळे लवकर वाटपाबाबत आम्ही माजी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देवून उद्योजकांची बैठक घेतली होती. गाळे लवकर ताब्यात देणार नसाल तर; आम्ही ताब्यात घेवू, असा
इशारा आम्ही दिला होता. महिला उद्योजकांना गाळे द्या, अशी आमची मागणी आहे.’’
- अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन.

‘‘दोन महिन्यांपूर्वी हा प्रकल्प माझ्याकडे आला आहे. टी ब्लॉक-२०१ मधील काम पूर्णत्वाकडे आहे. लवकरच उर्वरित काम पूर्ण होईल. काम उशिरा केल्याबद्दल ठेकेदारास प्रतिदिन ३ हजार रुपये दंड आकारत आहोत.’’
- ए. डी. शिंदे, कार्यकारी अभियंता, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी-चिंचवड महापालिका.

प्रकल्पाचे काम मुंबईतील न्यू इन्फ्रा ठेकेदार संस्थेकडे आहे. प्रकल्पाचे ८५ टक्के काम म्हणजे ३०६ गाळे बांधून पूर्ण झाले आहेत. पायाभूत सोयी-सुविधांचे उर्वरित १५ टक्के काम मार्च २०२२ अखेरपर्यंत पूर्ण होईल. इमारत रंगरंगोटी, अंतर्गत सिमेंटचे रस्ते, सुशोभीकरण, झाडे लावणे आदी काम राहिले आहे.
- जयकुमार गुजर, उपअभियंता, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी-चिंचवड महापालिका.

फोटो ः 05289, 05290, 05291, 05292, 05293, 05294, 05295