कर्जरोखे उभारून नदी पुरुज्जीवन खर्च मजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जरोखे उभारून नदी पुरुज्जीवन खर्च मजूर
कर्जरोखे उभारून नदी पुरुज्जीवन खर्च मजूर

कर्जरोखे उभारून नदी पुरुज्जीवन खर्च मजूर

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ ः शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नद्या पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यासाठी कर्जरोख्यांच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपये महापालिका उभारणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावास यापूर्वीच मान्यता मिळाली असून त्याचे काम खासगी संस्थांमार्फत केले जाणार आहे. या प्रकल्पासाठीच्या प्रत्यक्ष खर्चास सर्वसाधारण सभेने मंगळवारी मंजुरी दिली. त्यासह विविध कामांसाठीच्या आठ कोटी ४२ लाख रुपये खर्चासह मंजुरी मिळाली.
प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उल्हास जगताप उपस्थित होते. मांजरांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्याची कार्यवाही तसेच उपाययोजना करणेकामी धोरण निश्चित केले आहे. या धोरणास आणि महापालिकेच्या भोसरी येथील मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र नरसिंग रेसलिंग अॅकडमीला १० वर्षे कराराने चालविण्यास देण्याच्या विषयासही मान्यता दिली. पवना व इंद्रायणी नद्यांचे पुनरुज्जीवन महापालिका करणार आहे. मुळा नदीला पुणे महापालिकेचीही हद्द आहे. त्यामुळे दोन्ही महापालिका मिळून तो खर्च केला जाणार आहे. वाकडपासून बोपखेलपर्यंत मुळा नदीची लांबी सुमारे १४ किलोमीटर आहे. त्यासाठी ७५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात वाकड बाह्यवळण मार्ग पुल ते सांगवी पूल या ८.८ किलोमीटर लांबीसाठी ३२१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

मंजुरी मिळालेले विषय व खर्च
- जुनी व नवी सांगवी आणि संत तुकारामनगर व कासारवाडी परिसरातील जलवितरण ः प्रत्येकी ५७ लाख
- पिंपळे निलख, रहाटणी, ताथवडे, पुनावळे, काळाखडक, लक्ष्मणनगर, गणेशनगर, वाकड, भगवाननगर, दत्तनगर जलवितरण ः ३ कोटी ४ लाख
- दापोडी परिसरात जलवितरण ः ६० लाख
- थेरगाव पवारनगर नंबर दोन ते प्रसुनधाम सोसायटी रस्त्यांतील अतिउच्चदाब वीजवाहिनी टॉवर हलविणे ः ८१ लाख
- प्रभाग १७ मधील महापालिका शाळेच्या इमारतींची देखभाल-दुरुस्ती ः २३ लाख
- भोसरी येथील जलतरण तलावाची खोली कमी करणे व स्थापत्य विषयक कामे ः २ कोटी ३७ लाख

अन्य महत्त्वाचे मंजूर विषय
- चिखली प्राधिकरण सेक्टर १६ राजे शिवाजीनगर येथील महिला व पुरुष व्यायामशाळा माजी महापौर राहुल जाधव यांच्या राहुलदादा जाधव स्पोर्टस फाउंडेशनला ११ महिने कराराने दरमहा दोन हजार रुपये सेवाशुल्क आकारून चालवण्यास देणे
- अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्ज स्ट्रक्चरसह ठेकेदाराने स्वखर्चाने काढणे. त्याच्या भंगाराच्या मोबदल्यात रक्कम देणे. या निविदा प्रक्रियेनंतर अरबाज इंजिनिअरिंग ॲण्ड सिव्हिल कंट्रक्शनला ३३ लाख रुपये अदायगिने देणे
- लेखा परीक्षण विभागासाठी सेवानिवृत्त पाच कर्मचाऱ्यांना सहा महिने कालावधीसाठी मानधनावर नियुक्त करणे.