पवना व इंद्रायणी नदी सुधारप्रकल्प कागदावरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indrayani River
नदी सुधारप्रकल्प कागदावरच

River Project : पवना व इंद्रायणी नदी सुधारप्रकल्प कागदावरच

पिंपरी - गेल्या दहा वर्षांपासून चर्चेत असलेला पवना व इंद्रायणी नदी सुधारप्रकल्प अद्याप कागदावरच आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडला पवना नदीचे प्रदूषित पाणी प्रक्रिया (शुद्धीकरण) करून तर, देहू व आळंदीत येणाऱ्या भाविकांना इंद्रायणी नदीचे रसायन व मैलामिश्रित पाण्यातच स्नान करावे लागत आहे. इंद्रायणीचे पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचे माहीत असूनही भाविक तीर्थ म्हणून त्या पाण्याचा उपयोग करतात. त्यामुळे या दोन्ही नद्यांचे प्रदूषण केंव्हा संपणार आणि नदी सुधार प्रकल्प केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न आळंदीतील कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पुन्हा उपस्थित झाला आहे.

नदीसुधार प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाकडे (एनआरसीडी) दोन मे २०१२ रोजी सादर केला होता. त्यानंतर सुधारित प्रकल्प अहवाल महापालिकेने राज्य सरकारला १४ ऑगस्ट २०१३ रोजी सादर केला होता. पवना व इंद्रायणी सुधार प्रकल्पांचे सर्वेक्षण महापालिकेतर्फे नियुक्त सल्लागार समितीने २०१८ मध्ये पूर्ण केले आहे. त्यासाठी कर्जरोख्यांद्वारे निधी उभारण्याच्या प्रस्तावास गेल्या वर्षी सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.

दहा वर्षांपासून चर्चा

- पवना व इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून चर्चेत

- दोन्ही प्रकल्पांचे मास्टर प्लॅन तयार

- राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाची मंजुरी

- शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीतूनच अशुद्ध जलउपसा

- भविष्यातील नियोजन म्हणून निघोजे-तळवडे येथे इंद्रायणी नदीवर बांध बांधून अशुद्ध जलउपसा केला जाणार

- आंद्रा धरणातून नदीत पाणी सोडले जाणार

- नदीवर आळंदी, केडगाव, चऱ्होली खुर्द, धानोरेसह लगतच्या गावांतील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित

- प्रदूषण कमी करून नदीसुधार अर्थात पुनरुज्जीवन प्रकल्प राबवणे आवश्यक

- सर्व खर्च पिंपरी-चिंचवड महापालिका करणार

- मुळा नदी पुनरुज्जीवनाचा खर्च दोन्ही महापालिका करणार

नद्यांची सद्यःस्थिती

- इंद्रायणी - शहराच्या उत्तरेकडून इंद्रायणी नदी वाहते. तिच्या काठावरच संत तुकाराम महाराज यांचे देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदी हे तीर्थक्षेत्र आहेत. या नदीमध्ये पिंपरी-चिंचवड, चाकण औद्योगिक परिसरासह लगतच्या गावातील सांडपाणीही गटारे, सांडपाणी वाहिन्या व नाल्यांद्वारे सोडले जाते. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले आहे.

- पवना - शहराच्या मध्यातून नदी वाहते. त्यामध्ये शहरातील सांडपाणी मिसळले जाते. रावेत येथील बंधाऱ्यातून शहरासाठी अशुद्ध जलउपसा केला जातो. महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिर नदी काठावरच आहे. किवळे-मामुर्डीपासून दापोडीपर्यंत नदीचे क्षेत्र शहरात आहे.

- मुळा - शहराची दक्षिण सीमा नदीमुळे निश्चित झाली आहे. वाकडपासून दापोडीपर्यंत नदीचे क्षेत्र आहे. दापोडी व जुनी सांगवी येथे मुळा व पवना नदीचा संगम आहे. तेथून पुढे मुळा नदी या नावाने ओळख आहे. बोपखेल येथील रामनगरपर्यंत नदीचा उत्तरेकडील काठ महापालिका क्षेत्रात असून संपूर्ण पात्र पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे.

नदी सुधारबाबत सद्यःस्थिती

- इंद्रायणी - केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्था आणि जलसंपदा विभागाचा अहवाल यायचा आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तो आल्यानंतर पर्यावरण समितीकडे दिली जाईल. साधारण मार्चपर्यंत अहवाल अपेक्षित आहे.

- पवना - केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्थेचा अहवाल आला आहे. आता पर्यावरण समितीच्या बैठकीत तो अहवाल ठेवला जाईल. त्यांच्या मंजुरीनंतर निविदा निघेल. हे प्रक्रिया साधारण डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल.

- मुळा - पर्यावरण समितीची परवानगी मिळाली आहे. पुढच्या आठवड्यात निविदा निघेल. दोन्ही महापालिका मिळून खर्च केला जाणार असून पिंपरी-चिंचवडचा वाटा ३२१ कोटींचा आहे. कर्जरोख्यांद्वारे २०० कोटी उभारले जातील.

नद्यांची शहरातील लांबी

  • पवना - २४.५ किलोमीटर

  • इंद्रायणी - १६ किलोमीटर

  • मुळा - १२.५ किलोमीटर

पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठीचा निधी कर्जरोख्यांद्वारे उभारला जाणार आहे. तो प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मुळा नदी सुधारसाठीच्या कर्जरोख्यांच्या विषयासही सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. तो प्रस्तावही सरकारकडे पाठवला जाईल.

- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका

अनेक वर्षांपासून नदी सुधार प्रकल्प चर्चेत आहे. आतापर्यंत हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवा होता. कॉंक्रिटचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने सुधारणा व्हायला हवी. जैवविविधता जोपासली पाहिजे. नागरिकांनीही प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्रकल्पाला गती द्यावी.

- सिकंदर घोडके, स्वयंसेवक, पर्यावरण संवर्धन समिती