पालखी मार्गावर बीआरटीची प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालखी मार्गावर बीआरटीची प्रतिक्षा
पालखी मार्गावर बीआरटीची प्रतिक्षा

पालखी मार्गावर बीआरटीची प्रतिक्षा

sakal_logo
By

पालखी मार्गावर
बीआरटीची प्रतीक्षा

पिंपरी, ता. १८ ः बीआरटी मार्ग तयार आहे. बसथांबे तयार आहेत. थांब्यांवर सुरक्षा रक्षक आहेत. बस मात्र मुख्य रस्त्यावरून धावताहेत. त्यामुळे प्रवाशांना निवाऱ्याशिवाय ऊन-पावसात थांबून बसची वाट बघावी लागत आहे. शिवाय, अन्य वाहनांतून मार्ग काढत चालकांना बस चालवावी लागत आहे. हे चित्र आहे, आळंदी-पुणे पालखी मार्गावरील काटेवस्ती ते दिघीतील दत्तनगर या सुमारे आठ किलोमीटर बीआरटीएसचे. प्रशासनाच्या मते मात्र, काही किरकोळ कामे बाकी होती, दिव्यांसह विद्युत विषयक व अन्य उपकरणे, साहित्य चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्यक्ष बससेवा सुरू करण्यापूर्वी काही दिवस अगोदर दिवे व अन्य उपकरणे बसविण्याचे काम करायचे, असे नियोजन होते.

शहरात सुरू असलेले मार्ग
१) दापोडी ते निगडी
२) सांगवी फाटा ते रावेत
३) काळेवाडी फाटा ते चिखली
४) नाशिक फाटा ते वाकड

आळंदी-दिघी मार्गाची स्थिती
- काटे वस्ती चऱ्होली ते दिघीतील दत्तनगर हा मार्ग बांधून तयार
- मार्गावरून अद्याप बससेवा सुरू नाही
- सर्व बस मुख्य रस्त्यावरून धावतात
- आळंदी ते पुणे असा हा आठ पदरी पालखी मार्ग
- पूर्वीचे बसथांब्यांवरील प्रवासी निवारे (शेड) काढले
- प्रवाशांना रस्त्यावर बसची पाहावी लागतेय वाट

मार्ग एक प्रकार अनेक
- मुळ मार्ग आळंदी ते पुणे (शिवाजीनगर) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग
- आळंदी ते काटे कॉलनी साधारण दीड किलोमीटर दुहेरी रस्ता असून मध्ये दुभाजक
- काटे कॉलनी ते दत्तनगर दिघी आठ पदरी, बीआरटी, मुख्य रस्ता व सेवा रस्ताही
- दत्तनगर ते दिघी गावठाण साधारण दीड किलोमीटर चार पदरी रस्ता, मध्ये दुभाजक
- दिघी गावठाण ते वायरलेस थांबा, साधारण दीड किलोमीटर दुहेरी रस्ता, दुभाजक नाही
- वायरलेस थांबा ते विश्रांतवाडी चौक साधारण चार किलोमीटर चार पदरी रस्ता, दुभाजक
- विश्रांतवाडी ते संगमवाडी बीआरटी मार्ग व मुख्य रस्ता, काही ठिकाणी सेवा रस्ताही
- संगमवाडी ते शिवाजीनगर दुपदरी रस्ता, दुभाजक नाही, दरम्यान उड्डाणपूल

धावणाऱ्या बस
- आळंदी ते निगडी अलंकापूरम् मार्गे, एक किलोमीटर बीआरटी मार्ग
- आळंदी ते भोसरी, जांबे, हिंजवडी, बालेवाडी म्हाळुंगे, निगडी, दापोडी, पिंपळे सौदागर मॅग्झीन चौक मार्गे साधारण चार किलोमीटर बीआरटी
- आळंदी ते हडपसर, भेकराईनगर, पुणे कार्पोरेशन, स्वारगेट, मार्केटयार्ड, पुणे स्टेशन, पिंपळे निलख
- चऱ्होली ते आळंदी, रहाटणी, भोसरी, कार्पोरेशन
- निगडी ते हडपसर, पुणे स्टेशन, वाघोली विश्रांतवाडी मार्गे
- भोसरी ते पुणे स्टेशन, वाघोली, हडपसर विश्रांतवाडी मार्गे
- बोपखेल ते पिंपरी भोसरी मार्गे
- भोसरी ते बहुळ आळंदी मार्गे

इथे आहेत बसथांबे
- दत्तनगर दिघी, मॅग्झीन कॉर्नर (भोसरी फाटा), थोरल्या पादुका मंदिर (साई मंदिर), वडमुखवाडी, चोविसावाडी, चऱ्होली फाटा, काटे वस्ती.

विलंबाची कारणे
- बसथांब्यांची किरकोळ कामे संथगतीने पूर्ण
- विद्युत विषयक कामे आता पूर्णत्वाकडे
- पीएमपी व महापालिका पत्राद्वारे समन्वय

प्रशासन म्हणते...
- काही किरकोळ कामे बाकी होती
- बल्ब, बोर्ड असे साहित्य चोरीची शक्यता
- चोरी टाळण्यासाठी सेवेपूर्वी काही दिवस अगोदर कामे

पुण्यात कोंडी
पुण्यात स्वारगेट ते हडपसर, स्वारगेट ते कात्रज, येरवडा ते चंदननगर, संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गांवर बीआरटी आहे. मात्र, या रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होते. कोंडी होण्याच्या अनेक कारणांपैकी बीआरटी मार्ग हे एक कारण असल्याचे मत पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आठ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत व्यक्त केले होते. यातील संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गालाच पुढे दिघी दत्तनगर ते काटेवस्ती चऱ्होली बीआरटी मार्ग जोडला आहे. विश्रांतवाडी ते दत्तनगरपर्यंत दुहेरी रस्ता आहे.

पिंपरी-चिंचवड प्रशस्त
पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी फाटा ते रावेत, काळेवाडी फाटा ते चिखली, नाशिक फाटा ते वाकड, दापोडी ते निगडी हे चार बीआरटी मार्ग प्रशस्त आहेत. सहा व आठ पदरी रस्ते आहेत. सर्वच मार्गांना बीआरटी व्यतिरिक्त मुख्यरस्ता, सेवारस्ता व दोन्ही बाजूला पदपथ आहेत. हे चारही मार्ग एकमेकांना जोडले आहेत. दिघी दत्तनगर ते काटेवस्ती चऱ्होली बीआरटी मार्ग स्वतंत्र आहे. त्याला जोडणारा आळंदी-देहू बीआरटी मार्ग प्रस्तावित आहे. तो चिखलीतून काळेवाडी बीआरटीला जोडला जाईल.

‘‘मी अकरावीची विद्यार्थिनी आहे. डुडुळगावमध्ये राहाते. आळंदीतील देहू फाटा येथून पुणे स्टेशनपर्यंत जाते. देहू फाटा येथे बसथांबा आहे. पण, बसण्यासाठी जागा नाही. उभे राहूनच बसची वाट बघावी लागते. हडपसर व स्वारगेट जाणाऱ्या बसने प्रवास करते. बस बीआरटी आहे, पण त्या मार्गाने जात नाही. बाहेरून मुख्य रस्त्यावरून जाते.
- अक्षया, विद्यार्थिनी, डुडुळगाव

‘‘आळंदी-पुणे बीआरटी मार्गातून बससेवा सुरू करण्याची आमची तयारी आहे. पण, बसथांबे व मार्गातील काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. दिशा दर्शक, बसमार्ग दर्शक, सूचना फलक लावण्याबाबत व अन्य कामे पूर्ण करण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेला पत्र दिले आहे. ती कामे पूर्ण होताच, बीआरटीतून बससेवा सुरू होईल.
- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

‘‘आळंदी-पुणे बीआरटी मार्गाचे व बसथांब्यांचे काम पूर्ण झाले आहे. बससेवा सुरू करण्याबाबत पीएमपीला कळविले आहे. दोन-तीन दिवसांत त्यांच्याकडून बससेवा सुरू होईल. त्या दरम्यान काही त्रृटी आढळून आल्यास त्या तातडीने पूर्ण करून दिल्या जातील.’’
- प्रमोद ओंबासे, सहशहर अभियंता, बीआरटीएस, महापालिका
----