छाटणीच्या नावे झाडांची सर्रास कत्तल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छाटणीच्या नावे झाडांची सर्रास कत्तल
छाटणीच्या नावे झाडांची सर्रास कत्तल

छाटणीच्या नावे झाडांची सर्रास कत्तल

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ ः शहरातील उद्याने, मैदाने, मोकळ्या जागा, रस्ते आदी ठिकाणच्या झाडांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. त्याकडे महापालिका प्रशासन व उद्यान विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असून पर्यावरणप्रेमी वा सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतरच तेही जुजबी कारवाई होताना दिसत आहे. असाच प्रकार चिंचवड स्टेशन परिसरातील विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी घडला. मात्र, कारवाई झाली नाही. अखेर नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर पिंपरी पोलिसांकडे उद्यान विभागाने फिर्याद दिली.
झोपडपट्टी बहुल भाग असलेल्या मोहननगर, विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर परिसरात काही कंपन्या व वर्कशॉप आहेत. खाणीच्या परिसरात मोठमोठी जुनी व नव्याने लावलेली झाडे आहेत. तेथील काही झाडे सोमवारी सायंकाळी सातनंतर अर्थात अंधार पडल्यानंतर कापायला सुरुवात झाली. झाडे कापून लाकडे ट्रकमध्ये भरली जात होती. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी झाडे तोडणारे व वाहतूक करणाऱ्यांबाबत महापालिका उद्यान विभागाकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी पोलिसांकडे केवळ तक्रार दिली. त्यास पर्यावरण प्रेमींनी आक्षेप घेतल्यानंतर गुरुवारी रात्री पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

उद्यान विभाग म्हणतंय...
मोहननगर चिंचवड येथील महात्मा फुले उद्यानातील फायकस (वडाची प्रजात) १४, मेल्टोफोरम (ताम्रवृक्ष) सहा, चिंचेचे एक अशा २१ झाडांच्या फांद्यांच्या छाटणी, एक वाळलेली सुबाभूळ, वडाच्या नऊ फांद्या व पारंब्या जमिनीपासून विनापरवाना पूर्ण काढल्याची तक्रार धरम वाघमारे यांनी केली आहे. त्यानुसार उद्यान सहायक व उद्यान अधीक्षक यांनी पंचनामा करून अहवाल दिला आहे. त्यानुसार, इश्रार जफर शा (रा. बौद्धनगर, काळभोर गोठा, सेक्टर २२, निगडी) याने सदर वृक्ष विनापरवाना तोडले आहेत. त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार व फिर्याद उद्यान विभागाचे उपआयुक्त सुभाष इंगळे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम आणि भारतीय दंड संहिता कलम ३७९ व ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

कायदा काय सांगतो
- महाराष्ट्र राज्य (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५, कलम २१ (१) ः विनापरवाना वृक्षतोड किंवा वृक्षछाटणी करून पर्यावरणाला हानी पोचविणे
- भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७९ ः चोरी
- भारतीय दंड संहिता १८६० कलम ४२७ ः अत्याचार

पर्यावरणप्रेमी म्हणतात...
- झाडे तोडण्याची वा छाटण्याची परवानगी आहे, तर दिवसा तोडा, रात्री का?
- फांद्या छाटायची परवानगी असताना खोडासह झाड तोडण्याचे कारण काय?
- अनेक वर्ष जुनी सदाहरित झाडे मुळासह काढले जात आहेत.

यापूर्वीच्या घटना
- पिंपळे सौदागर-वाकड-हिंजवडी, देहू-आळंदी रस्ता आणि पुणे-मुंबई महामार्ग सेवा रस्त्याच्या कडेच्या जाहिरात फलकांच्या समोरील झाडांची वारंवार छाटणी
- नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रॉस हॉकी मैदान परिसरातील झाडांची कत्तल
- नवनगर विकास प्राधिकरण सेक्टर २६ मधील गणेश तलाव परिसरातील झाडांची छाटणी व खोडापासून कापणी
- एमआयडीसीतील एका कंपनीच्या आवारातील शंभरहून अधिक झाडांची कत्तल, तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्याकडून ४५ लाख दंडाचा आदेश
- चिखली प्राधिकरण सेक्टर १८ शिवतेजनगर मधील खाणींच्या परिसरातील सुमारे ४० झाडे तोडणी
- निगडीतील दुर्गादेवी टेकडीवरील सुबाभूळ व अन्य झाडांची तोडणी

दोषी कोण ठरू शकतात?
- झाडांची विनापरवाना कत्तल व छाटणीकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी-कर्मचारी
- वृक्ष छाटणीची परवानगी घेऊन खोडासह झाडे काढणारे ठेकेदार, संबंधित जागामालक
- वृक्षतोड करणारे मजूर, लाकडे वाहून नेणारे वाहनचालक, मालक
- विनापरवाना तोडलेल्या झाडांची लाकडे विकणारे, विकत घेणारे

पिंपरी-चिंचवडमध्ये झाडांची कत्तल करणारे ‘वुड माफिया’ आहेत. ते कुणालाही जुमानत नाहीत, असे पर्यावरण क्षेत्रात कार्यरत लोकांनी महापालिका प्रशासनाला वारंवार सांगितले आहे. तरीही कारवाई होत नाही. त्याचाच एक कटु अनुभव नुकताच विद्यानगर, दत्तनगर भागात आला. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित कडक कारवाई करावी.
- धनंजय शेडबाळे, स्मार्ट सिटी एनजीओ सदस्य

महापालिका अधिकारी व ठेकेदार मिळून झाडांची कत्तल सुरू आहे. प्रभाग दहामधील दत्तनगर, विद्यानगर भाग झोपडपट्टीचा असल्यामुळे त्याला कोणी वाली नाही का? अशी स्थिती आहे. झाड तोडणे ही एक प्रकारे हत्याच असून पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरणारे आहे. झाडे तोडण्यास दोषी असलेले अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी.
- अमित गोरखे, माजी अध्यक्ष, अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ

डिसेंबर २०२१ पर्यंतच्या वृक्षगणनेनुसार स्थिती
शहरातील वृक्ष ः ३२,१६,७९९
झाडांचे जाती-प्रजाती ः २२०
हरित क्षेत्र (चौरस किलोमीटर) ः १८१
उद्यानांची संख्या ः १८४