‘माउलीं’च्या जयघोषाने भक्तिरसात न्हाली अलंकापुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘माउलीं’च्या जयघोषाने भक्तिरसात न्हाली अलंकापुरी
‘माउलीं’च्या जयघोषाने भक्तिरसात न्हाली अलंकापुरी

‘माउलीं’च्या जयघोषाने भक्तिरसात न्हाली अलंकापुरी

sakal_logo
By

आळंदी, ता. १९ ः आकर्षक फुलांची सजावट...रंगबेरंगी विजेच्या माळांचा झगमगाट...नयनमनोहरी रांगोळी... सनईचा मंजूळ स्वर...अशा मंगलमय वातावरणात संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून अकरा ब्रम्हवृंदांनी केलेल्या मंत्रघोषात कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींना पंचामृताने विधीवत पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर लाखो भाविकांनी माउलींचे साजिरे रूप डोळ्यात साठविले आणि ‘ज्ञानोबा माउलीं’च्या जयघोषाने अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
रात्री साडेअकराच्या सुमारास देऊळवाड्याच्या पश्चिमेकडील दर्शनमडंपातून येणारी दर्शनाची रांग माऊलींच्या पवमान अभिषेकासाठी बंद करण्यात आली. पावणेबाराच्या सुमारास स्वकाम सेवा मंडळाच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण देऊळवाडा स्वच्छ करण्यात आला. साडेबाराच्या सुमारास घंटानाद झाल्यानंतर महापुजेला सुरवात झाली. सनई चौघड्यांचा मंजूळ स्वर पुजारी वेदमूर्ती प्रसाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली अकरा ब्रम्हवंदाच्या वेदघाषात अभिषेकाला सुरुवात झाली. माउलीच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून माउलींना पंचामृत अभिषेक सुरू झाला. पंचामृताने समाधीला स्नान घालण्यात आले. समाधीवरील चांदीचा मुखवटा शाल, तुळशी, मोगऱ्याचा हार आणि डोईवर मुकुट ठेवून, त्यावरील सोनेरी छत्रचामराने समाधीचे रूप अधिकच खुलून आले. माउलींची आरती झाली आणि मानकरी आणि सेवेकऱ्यांना नारळप्रसाद देण्यात आले. आरतीनंतर समाधी दर्शनासाठी कारंजे मंडपातील निमंत्रित पासधारकांना सोडण्यात आले. दोननंतर दशर्नबारीतील भाविकांची रांग सुरू करण्यात आली. सिद्धेश्वर मंदिरात मुरलीधर प्रसादे यांच्याकडून रुद्राभिषेक करण्यात आला.
यावेळी गाभारा मंदिरात आमदार दिलीप मोहिते-पाटील, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, अॅड. विकास ढगे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासक शेखर सिंह, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, मुख्याधिकारी अंकुश जाधव, बाळासाहेब चोपदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, डी. डी. भोसले यांच्यासह नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, माजी विश्वस्त तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

जवानाला महापूजेचा मान
कार्तिकी एकदशीच्या महापूजेसाठी दर्शनबारी बंद केल्यानंतर पहिल्या जोडप्याला दिला जाणारा पूजेचा मान यंदा सीआरपीएफ जवान गोरक्षनाथ बाळासाहेब चौधरी (वय २९) आणि आयटी कर्मचारी सविता गोरक्षनाथ चौधरी या दांपत्यास मिळाला. यावेळी देवस्थानच्यावतीने त्यांचा प्रमुख विश्वस्त योगेश देसाई आणि ॲड. विकास ढगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याबाबत चौधरी म्हणाले, ‘‘आमच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहे. मी सीआरपीएफमध्ये छत्तीसगड येथे कार्यरत आहे. दोन दिवसांपूर्वीच आलो. आळंदीला दर्शनासाठी आलो होतो, सायंकाळी पाचला रांगेत थांबलो, पाच तासानंतर आम्हाला थेट महापूजेचा मान मिळाल्याचे कळाले. महापूजा करायला मिळेल, हे स्वप्नात पण वाटले नव्हते. माझे वडील निळोबारायांच्या वारीतील वारकरी आहेत. महापूजेचे जे भाग्य आम्हाला मिळाले आहे. हे व्यक्त करायला शब्द नाहीत.

मंगलमय वातावरण
एकादशीनिमित्त देऊळवाड्यात संदीप दौंडकर यांच्यावतीने आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. महाद्वारात आणि वीणा मंडपाबाहेर रंगावलीकार राजश्री जुन्नरकर हिने भव्य रांगोळी काढली होती. तसेच मंदिराला विजेच्या माळांनी आणि दिव्यांनी केलेली आकर्षक सजावट लक्षवेधी होती.

६२३१, ६२३०, ६२३९