कार्तिकी वारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्तिकी वारी
कार्तिकी वारी

कार्तिकी वारी

sakal_logo
By

माउलींच्या दर्शनासाठी रथोत्सवास प्रचंड गर्दी

ठिकठिकाणी स्वागत; भक्तिमय वातावरणात उत्साहात नगरप्रदक्षिणा

आळंदी, ता. २१ ः चांदीचा मुखवटा....तुळशी मंजिऱ्यांचा हार...पादुकांना णलागणारे लाखो हात...अन् ब्रम्हवृंदांनी सुवर्ण आभूषणांनी सजविलेले माउलींचे रूप डोळ्यात साठवीत वारकऱ्यांनी अभंगांचा गजर केला. टाळ-मृदंगाचा टिपेला पोचलेला निनाद अन् पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामाचा चालू असलेला अखंड नामघोष...अशा भक्तीमय वातावरणात माउलींच्या रथाची नगरप्रदक्षिणा झाली. शहरात माउलींचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले.
वारकऱ्यांनी पहाटेच्या बोचऱ्या थंडीत इंद्रायणी स्नान केले. द्वादशी सोडल्यानंतर काही वारकऱ्यांनी परतीच्या मार्ग धरला. परंपरेने आलेले वारकरी, फडकरी माउलींच्या उद्याच्या संजीवन समाधीदिन सोहळ्यासाठी मुक्कामी आहेत. सोमवारी पहाटे देवस्थानच्यावतीने माउलींच्या समाधीवर पवमान पूजा झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या उपस्थितीत पंचोपचार पूजा झाली. अप्पर तहसीलदार हरिश सूळ उपस्थित होते. पहाटे तीन ते सहा या वेळेत मुक्ताई मंडपात नांदेडकर दिंडीच्यावतीने काकडा भजन सुरू होते. पहाटे पाच ते साडेअकरा दरम्यान भाविकांच्‍या महापूजा झाल्या. दुपारी साडेबारा ते एकमध्ये महानैवेद्य झाला. सायंकाळी चार वाजता वीणा मंडपात महादेव महाराज बडवे यांचे कीर्तन झाले. सायंकाळी चार वाजता मंदिरातून पालखीतून पादुका आळंदीकरांनी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर आणली. माउलींचा आकर्षक चांदीचा मुखवटा पालखीमध्ये ठेवण्यात आला होता. महाद्वार शनिमंदिर, झाडीबाजार, चाकण चौक मार्गाने गोपाळपुरात पालखी पायी आणली. यावेळी दर्शनासाठी दुतर्फा गर्दी होती. गोपाळपुरात पालखी आल्यानंतर येथील गोपालकृष्ण मंदिरात पालखी विसावली. याठिकाणी इनामदार कुटुंबीयांनी मुखवट्याचे विधिवत पूजन केले. पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, ज्ञानेश्वर वीर, भागवत महाराज कबीर, आबामहाराज चाकणकर उपस्थित होते. राजाभाऊ भुजबळ यांच्या वतीने रथाची पुष्पसजावट करण्यात आली होती.
आरती झाल्यानंतर ब्रम्हवृंदांनी माउलींचा मुखवटा रथात ठेवला. पुजारी राजाभाऊ चौधरी आणि अमोल गांधी यांनी रथात आकर्षक सजावट केली. आरती करून रथ गोपाळपुरातून नगर प्रदक्षिणेसाठी पुढे मार्गस्थ झाला. रथोत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, माउलींची पालखी प्रदक्षिणेनंतर मंदिरात रात्री उशिरा पोचली. यावेळी समाधी मंदिरात देवस्थानच्यावतीने फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख, सेवेकरी यांना नारळप्रसाद वाटप करण्यात आले.

द्वादशीला मिष्ठानाचा आनंद
रविवारी दिवसभर उपवास असल्याने एकादशीचे पारणे फेडण्यासाठी सोमवारी राहुट्या आणि फडांमधून मिष्टान्नाचे बेत होते. जिलेबी, बुंदी, बालूशाही, पंचामृत, पुरणपोळ्या, डाळबट्टी, मांडेभोजनाचा बेत ठिकठिकाणी दिसून येत होता. भजन आणि भोजनाने वारकरी तृप्तीची ढेकर देत होते.

असा असेल संजीवन समाधीदिन सोहळा
- पहाटे प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते समाधीची पवमान पूजा
- हैबतबाबांच्या पायरीपुढे आरफळकरांच्या वतीने कीर्तन
- दहा वाजता नामदास महाराज यांचे वीणा मंडपात कीर्तन
- बारा वाजता घंटानाद, पुष्पवृष्टी, आरतीने समाधिदिन सोहळा