अतिरिक्त आयुक्तपदी सुनील थोरवे स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये नाराजी ः तिसरे अतिरिक्त आयुक्तही राज्य सेवेतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिरिक्त आयुक्तपदी सुनील थोरवे
स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये नाराजी ः तिसरे अतिरिक्त आयुक्तही राज्य सेवेतील
अतिरिक्त आयुक्तपदी सुनील थोरवे स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये नाराजी ः तिसरे अतिरिक्त आयुक्तही राज्य सेवेतील

अतिरिक्त आयुक्तपदी सुनील थोरवे स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये नाराजी ः तिसरे अतिरिक्त आयुक्तही राज्य सेवेतील

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : पिंपरी-चिंचवड महापालिकेत राज्य सेवेतील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवर कार्यरत असताना आता तिसरे अतिरिक्त आयुक्तही राज्य सेवेतीलच आले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी राज्य सरकारने नियुक्ती केली. थोरवे यांनी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे साताऱ्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे आयुक्तांनी शिफारस करून मर्जीतील अधिकारी आणल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
थोरवे यांची कोणत्या अतिरिक्त आयुक्तांच्या जागी नियुक्ती केली, हे आदेशात म्हटले नाही. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांसाठीच्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाचा प्रभारी पदभार असलेल्या नगरसचिव उल्हास जगताप यांना खुर्ची सोडावी लागणार आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. राज्य सेवेतील तिसरे अतिरिक्त आयुक्त आल्याने महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. पिंपरी महापालिकेचा समावेश ''ब'' वर्गामध्ये समावेश झाला असून, नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले आहेत.
महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरचे आणि महापालिका अधिकाऱ्यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. सद्यःस्थितीत राज्य सेवेतील जितेंद्र वाघ आणि प्रदिप जांभळे महापालिकेत कार्यरत आहेत. तर, स्थानिक अधिकाऱ्यांसाठी असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तांचा प्रभारी पदभार नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे १८ फेब्रुवारी २०२१ रोजी दिला होता.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी असलेल्या अतिरिक्त आयुक्तपदावर पदोन्नती देण्याकरिता पालिकेतील एकही अधिकारी निकष पूर्ण करत नसल्याचे पालिका प्रशासनाने राज्य शासनाला कळविले होते. त्यानुसार राज्य शासनाने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी सुनील थोरवे यांची नियुक्ती केली आहे. थोरवे यांनी पालिकेत तत्काळ रुजू व्हावे, असे आदेशात म्हटले आहे. याबाबतचा आदेश १८ नोव्हेंबर २०२२ रोजी नगरविकास विभागाचे सह सचिव डॉ. माधव वीर यांनी काढला आहे.
दरम्यान, महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे साताऱ्याचे जिल्हाधिकारी असताना थोरवे हे साताऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी होते. सिंह यांच्यासोबत त्यांनी काम केले. त्यामुळे सिंह यांनीच शिफारस करून थोरवे यांना पालिकेत आणल्याचे बोलले जात आहे. आपल्या मर्जीतील अधिकारी सिंह यांनी आणल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. थोरवे यांनी खेड, मावळचे प्रांत अधिकारी म्हणून काम केले आहे. यापूर्वी पिंपरी महापालिकेतही सहायक आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. याबाबत महापालिका आयुक्त सिंह यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

दोन-तीन दिवसात चित्र स्पष्ट होणार
सुनील थोरवे यांच्या बदलीचा आदेश महसूल विभागातून निघाला आहे. दोन-तीन दिवसात राज्य सरकारच्या नगर विकास विभागातून बदलीचा आदेश निघणार आहे, असे विश्वसनीयरीत्या समजते. नगर विकास विभागाच्या बदलीच्या आदेशात थोरवे यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नक्की कुठल्या जागेवर पदभार देण्यात येणार आहे. याचा उल्लेख असणार आहे. त्यानुसार थोरवे कोणाच्या जागेवर येतात, हे नक्की कळणार आहे. त्यामुळे थोरवे प्रतिनियुक्तीवरील अतिरिक्त आयुक्तांच्या जागेवर येतात की स्थानिक अधिकाऱ्यांसाठी असलेल्या पदावर येतात, हे स्पष्ट होणार आहे.

महापालिकेतील कोणाची अर्हता


शहर अभियंता मकरंद निकम यांना गेल्या सहा महिन्यांपूर्वीच या पदावर पदोन्नती मिळालेली आहे. तर; आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना १५ दिवसांपूर्वी या पदावर पदोन्नती मिळालेली आहे. उपायुक्त आशा दुर्गुडे, चंद्रकांत इंदलकर व संदीप खोत यांना या पदावर पदोन्नती मिळून दीड ते दोन वर्षेच झालेले आहेत. तर; नगरसचिव पदावरील उल्हास जगताप यांची या पदावर ९ वर्षे सेवा झालेली आहे. राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार ९० टक्के सेवा झालेली असेल तरी तो अधिकारी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या पदोन्नतीसाठी पात्र ठरु शकतो. त्यामुळे जगताप या पदासाठी पात्र असून, त्यांनी त्यानुसार महापालिका आयुक्त व राज्य सरकारकडे रीतसर अर्ज केलेला असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.