चाकणच्या कंपनीतील कामगारांचे उपोषण आरोप खोटे असल्याचा कंपनी व्यवस्थापकांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणच्या कंपनीतील कामगारांचे उपोषण
आरोप खोटे असल्याचा कंपनी व्यवस्थापकांचा दावा
चाकणच्या कंपनीतील कामगारांचे उपोषण आरोप खोटे असल्याचा कंपनी व्यवस्थापकांचा दावा

चाकणच्या कंपनीतील कामगारांचे उपोषण आरोप खोटे असल्याचा कंपनी व्यवस्थापकांचा दावा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ : कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारून युनियन केल्याचा राग आल्याने कामगारांना मारहाण करणाऱ्या, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कोरियन ग्रुपच्या चाकण येथील डायचांग इंडिया सिट कंपनीतील अधिकारी, कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करावा, कामगारांना कंपनीच्या हजेरी पत्रकावर कायम करून घ्यावे, या मागण्यांसाठी सुमारे १२३ कामगार आजपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. हे कामगार कंत्राटी असून, त्यांचे आरोप खोटे आहेत. त्याच्याशी कंपनीचा काही संबंध नाही, असा दावा कंपनी व्यवस्थापनाने केला आहे.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे सर्व कामगार उपोषणाला बसले आहेत. हे कामगार चाकण येथील कंपनीजवळ उपोषणाला बसल्यास कंपनीचे अधिकारी, त्यांचे गुंड कामगारांना मारहाण करतील. त्यामुळे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कामगारांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. चाकण, खराबवाडीतील मे. डायचांग इंडिया सिट कंपनीत हे कामगार गेली अनेक वर्ष काम करत आहेत. कायदेशीररीत्या कंपनीत २४० दिवस नोकरी केल्यानंतर त्या कामगारांना कंपनी सेवेत कायम करायला पाहिजे. परंतु, तसे न करता या कामगारांना २ वर्षे प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) ठेवण्यात आले. त्यानंतर बेकायदेशीरपणे कंत्राटी पद्धतीने ठेवले.
कामगारांना कायदेशीर वेतन, सुट्या देखील मिळत नव्हत्या. कामगारांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. याबाबत संघटनेने अप्पर कामगार आयुक्तांना लेखी पत्राद्वारे कळविले. कंपनीला हे पत्र मिळताच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व कंत्राटदार प्रभू शिंदे यांनी कामावर असलेल्या कामगारांना बोलावून धमकी दिली, असा आरोप कामगारांनी केला आहे.

कंपनीचे मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक सिद्धार्थ भोसले म्हणाले की, मारहाण व धमकी दिल्याचे कामगारांचे आरोप खोटे आहेत. कंपनीचे उत्पादन बंद पाडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. हे कामगार स्वत: कंपनीत आले नाहीत व येणाऱ्या कामगारांना मारहाण करत होते. कंपनीला त्यांनी कामावर येत नसल्याची कुठलीही नोटीस दिलेली नाही. त्यांचे बेकायदा आंदोलन सुरु आहे.

या कामगारांना न्याय मिळावा, मारहाण करणाऱ्या व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अधिकारी व ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल व्हावा. गेली दोन महिन्यापासून कामावर येण्यास मनाई केलेल्या कामगारांना सेवेत कायम करून कामावर घ्यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे कामगार नेते यशवंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामगार आजपासून न्याय मिळेपर्यंत मुदत उपोषण करणार आहेत.
- करण भालेकर, कार्यालयीन सचिव, राष्ट्रीय श्रमिक आघाडी.