ग्राहकांकडून सक्तीची वसुली; घरगुती गॅस सिलिंडर पुरवताना ५० ते १०० रूपयांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

supplying domestic gas cylinders
ग्राहकांकडून सक्तीची वसुली डिलिव्हरी बॉय ः घरगुती गॅस सिलिंडर पुरवताना ५० ते शंभर रूपयांची मागणी

ग्राहकांकडून सक्तीची वसुली; घरगुती गॅस सिलिंडर पुरवताना ५० ते १०० रूपयांची मागणी

पिंपरी : सध्या एलपीजी सिलिंडर महागला असून, आधीच गृहिणींचे बजेट कोलमडलेले आहे. सर्वसामान्यांना इंधनाचा भुर्दंड परवडेनासा झाला आहे. त्यातच, घरगुती गॅस सिलिंडर पुरवठ्यातून आर्थिक लूट सुरु आहे. गॅस वितरक कंपन्यांमध्ये काम करणारे डिलिव्हरी बॉय सर्रास गृहिणींसह इतर नागरिकांकडून या ना त्या कारणाने गॅस घरपोच करण्याच्या नावाखाली ५० ते १०० रुपयांपर्यंत पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे. गॅस सिलिंडर संपला की, त्वरित दुसऱ्या सिलिंडरच्या टाकीची मागणी ग्राहकांकडून केली जाते. मात्र, गॅस सिलिंडर बुकींगवेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी-कधी बुकिंगसाठी नंबर लावला तरी, नोंद झालेली नसते. वेळेत सिलिंडर घरपोच मिळत नाही. कधी-कधी तुटवड्याचे कारण एजन्सीकडून समोर केले जाते. अशावेळी नागरिक मेटाकुटीला येतात.

काही ग्राहकांकडे एकच सिलिंडरची टाकी असल्याने ग्राहक थेट एजन्सीचा रस्ता धरतात.
गॅस एजन्सीमधून मिळालेल्या यादीनुसार, डिलिव्हरी बॉय सिलिंडर घरोघरी पोच करतात. त्यानुसार दिवसभरात जमेल तसे क्षमतेनुसार सिलिंडर पोचवले जातात. ‘घरपोच सिलिंडरसाठी वेगळे शुल्क आहे. ते तुम्हाला भरावे लागेल. ’ असे सांगून ५० ते १०० रुपये जादा घेतात. तुमच्या सोसायटीला लिफ्ट नाही किंवा दूरवर यावे लागले, अशी कारणे गृहिणींना दिली जातात. बऱ्याचदा गॅस दिल्याची नोंद डिलिव्हरी बॉय पुस्तकात करत देखील नाहीत. शिवाय, पावतीदेखील ग्राहकांना देत नाहीत. त्यामुळे, ग्राहकही जीवनावश्यक वस्तू असल्याने जास्त विचार न करता ५० ते १०० रुपये हातात देवून रिकामे होत असल्याचे दिसून आले आहे.

तक्रार आल्यास कारवाई
एका कंपनीच्या रिजनल ऑफिसरने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, कित्येकदा जादा पैसे घेण्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. एजन्सीसोबत झालेल्या करारानुसार आम्ही कारवाई करतो. नागरिकांनी स्वखुशीने पैसे दिल्यास हरकत नाही. परंतु, सक्तीने पैसे घेणे चुकीचे आहे. संबंधित एजन्सीकडे नागरिकांनी तक्रार करावी. त्वरित कारवाई केली जाईल.

गॅस बुकींग केल्यानंतर चार दिवसांनी मिळाला. डिलिव्हरी बॉयने फोनवर संपर्क साधला की, घरपोच सिलिंडर देत आहे. सिलिंडर चार दिवसांनी हातात मिळाला. डिलिव्हरी बॉयने दुसऱ्या परिसरात वितरण करत असल्याचे सांगितले. शिवाय, १०५६ रुपये शुल्क असताना १०८० रुपयांची मागणी केली. डिलिव्हरीचे पैसे अधिकृत आहेत का, अशी विचारणा केली असता, तो घाबरला. त्यावर तो म्हणाला, पैसे द्यायचे असेल तर द्या. सिलिंडर तुमच्या ताब्यात दिला आहे.
- पूजा, गृहिणी, दिघी रोड

डिलिव्हरी बॉय जादा पैसे मागत आहेत. हा बेकायदेशीर प्रकार आहे. अनेकदा नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर डिलिव्हरी बॉयला सूचना केल्या जातात. सध्या त्यांना घरपोच एका सिलिंडपाठीमागे १८ ते २० रुपये मिळतात. ग्राहकांनी बिलावरील रक्कमच त्यांना अदा करावी.
- मानव कांबळे, गॅस एजन्सी संचालक, चिंचवड

अधिकृत एजन्सीधारक : सुमारे २०
एलपीजी ग्राहक संख्या : सुमारे ३ लाख
एका एजन्सीमध्ये काम करणारे डिलिव्हरी बॉय : १५ ते ३०

काही नागरिकांनी स्वत:हून टिप्स स्वरुपात पैसे देण्याची सवय लावली आहे. तशीच सवय पुढे सर्वांना लागली आहे. बिलाप्रमाणे नागरिकांनी पैसे द्यावेत. बरेचदा काही जणांना आम्ही वारंवार सूचना दिल्या आहेत. बरेचदा डिलिव्हरी बॉयची वाहने पुरवठ्यासाठी असतात. तसेच, पगार स्वरुपातदेखील त्यांना रक्कम दिली जाते. तरीही, जादाचे पैसे ते घेतात.
- गणेश संभेराव, व्यवस्थापक, गॅस वितरक, भोसरी एमआयडीसी