आकुर्डीमध्ये क्रीडांगण विकसित करावे : ‘आप’चे चेतन बेंद्रे यांची आयुक्तांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकुर्डीमध्ये क्रीडांगण विकसित करावे : ‘आप’चे चेतन बेंद्रे यांची आयुक्तांकडे मागणी
आकुर्डीमध्ये क्रीडांगण विकसित करावे : ‘आप’चे चेतन बेंद्रे यांची आयुक्तांकडे मागणी

आकुर्डीमध्ये क्रीडांगण विकसित करावे : ‘आप’चे चेतन बेंद्रे यांची आयुक्तांकडे मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ : शहरातील आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, गंगानगर, विवेकनगर परिसरातील विद्यार्थी, युवक तसेच होतकरू खेळाडूंसाठी स्वतंत्र खेळाच्या मोठ्या मैदानाची नितांत गरज आहे. अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग या भागात राहतोय. या भागाची लोकसंख्या ४० हजारांवर गेली आहे. तरीसुद्धा खेळण्यासाठी महापालिकेचे एकही मैदान नाही. त्यामुळे या भागात मैदान उभारावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी व्यक्त केली.
हजारो रुपयांची फी देऊनही अनेक खासगी शाळांमध्येसुद्धा मैदान नाही. आजची तरुण पिढी टीव्ही, मोबाईल आणि संगणकामध्येच अडकून पडली आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदाने नसल्यामुळे कुठे खेळायचे, असा प्रश्‍न त्यांना पडतो. कबड्डी, क्रिकेट, खोखो, ज्यूडो, कराटे, फुटबॉल, बॅडमिंटन आदी मैदानी खेळ आणि इतर इनडोअर खेळांची या परिसरातील मुलांना आवड आहे.
आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, गंगानगर, विवेकनगरसह लगतच्या परिसरातील हजारो विद्यार्थी, युवक युवतीमध्ये क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी महापालिकेने नवीन मैदाने विकसित करावीत. त्यासाठी मोकळे भूखंड आरक्षित करून विशेष अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी आम आदमी पार्टी कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे केली.

‘‘केंद्र आणि राज्य सरकारच्या क्रीडा धोरणात सर्वांसाठी खेळाद्वारे सुदृढता हा केंद्रबिंदू ठरवण्यात आला होता. नागरिकांमध्ये शारीरिक सुदृढता आणि याद्वारे आरोग्यसंपन्न कार्यक्षम जीवनाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना या क्रीडा धोरणात सुचविण्यात आली होती. त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, बंदिस्त कोर्ट आणि मूलभूत सुविधांसह खेळांची मैदाने विकसित करावीत. ''अ'' क्षेत्रीय कार्यालयासाठी मागील वीस वर्षांत महापालिकेने कोणतेही क्रीडाधोरण राबवलेले नाही.
- चेतन बेंद्रे, कार्यकारी अध्यक्ष, आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड.