वाकडमध्ये दोन लाखांची घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकडमध्ये दोन लाखांची घरफोडी
वाकडमध्ये दोन लाखांची घरफोडी

वाकडमध्ये दोन लाखांची घरफोडी

sakal_logo
By

पिंपरी : लोखंडी दरवाजाचे कुलूप उघडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरुममधील लोखंडी कपाटाचा पत्रा उचकटून दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना काळेवाडीतील नढेनगर येथे घडली. याप्रकरणी समीर हकीम खान (रा. स्नेहा कॉलनी रोड, नढेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या बंद घराचा दरवाजा चोरट्याने कशाचे तरी साहाय्याने उघडला. आत शिरल्यानंतर बेडरूममधील कपाटाचा पत्रा उचकटून कपाटातील ४० हजार रुपयांची रोकड व एक लाख ६० हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरले.

दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना देहूगाव येथील माळवाडी येथे घडली. पुणेकर भोसले (वय ६०) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा राहुल पुणेकर भोसले (रा. लक्ष्मीनगर, झेंडेमळा, देहूगाव) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप (पूर्ण नाव माहीत नाही. रा. देहूगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुणेकर भोसले हे भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

काळेवाडीत तरुणीला मारहाण
भांडणाचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणीला चौदा जणांच्या टोळक्याने मारहाण केली. ही घटना काळेवाडीतील विजयनगर येथे घडली. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक मिस्तरी (वय ३६), राजेश मिस्तरी (वय ३८), विद्याधर मिस्तरी, नाना पाटील (वय ५५), अक्षय पाटील (वय ३०), रामा मिस्तरी (वय ३६), बाबू मिस्तरी (वय ३६) व सात महिला आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी तरुणीच्या मावशीच्या घरासमोरील भिंतीच्या वादावरून फिर्यादीच्या मावशीसोबत आरोपींचे भांडण सुरू होते. त्यावेळी फिर्यादी तरुणी आपल्या मोबाईलमध्ये भांडणाचा व्हिडिओ काढत होती. या वेळी आरोपी दीपकने तरुणीला ढकलले. यात तरुणीचा मोबाईल खाली पडला. त्यानंतर इतर आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. तसेच आरोपी अक्षय पाटील याने फिर्यादी यांच्या नाकावर बुक्का मारत त्यांच्या नाकाला दुखापत केली. आरोपी दीपक मिस्तरी याने पोटात लाथ मारली. तर, महिला आरोपींनी त्यांचे केस ओढले.

विवाहितेचा विनयभंग; आरोपी अटकेत
तरुणाने विवाहित महिलेला वारंवार फोन केले. तसेच तिच्या कुटुंबीयांसमोर तिच्याशी गैरवर्तन करीत विनयभंग केला. हा प्रकार मोशी येथील गणेश साम्राज्य चौक येथे घडला. याप्रकरणी २७ वर्षीय विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर शालिग्राम भांरबे (वय २९, रा. धनकवडी, कात्रज) याला पोलिसांनी अटक केली. फिर्यादी विवाहिता व आरोपी सागर हे अभियांत्रिकी महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत होते. तेव्हापासून त्यांची ओळख होती. सागरचे विवाहितेवर एकतर्फी प्रेम आहे. या प्रेमातून त्याने वारंवार विवाहितेला फोन केले. विवाहितेसोबतचे आपले फोटो व्हॅट्सऍपवर पाठविले. तसेच ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशिवाय कोणाचीच होवू शकत नाही’, असे मोठ्याने सांगत विवाहितेचे आई-वडील व पतीसमोर त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यावेळी पतीने विवाहितेला सागरच्या ताब्यातून सोडविले. याचा राग आल्याने ‘तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला पाहून घेईन’, अशी त्याने धमकी दिली.

वाकडममध्ये प्रवासी तरुणाला रिक्षाचालकाने लुटले
प्रवासी तरुणाला रिक्षाचालकाने बांधकाम प्रकल्पावर नेवून त्याच्याकडील दोन मोबाईल व लॅपटॉप जबरदस्तीने काढून घेतला. हा प्रकार वाकड येथे घडला. याप्रकरणी रघू वेंकटेशवल्लू पसफुलेटी (रा. फेज एक, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालक व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे कंपनीतून घरी जाण्यासाठी हिंजवडी येथून रिक्षात बसले. त्यानंतर रिक्षा चालकाने रिक्षा वाकड येथे सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पाजवळ नेली. तेथे फिर्यादी यांचा दहा हजार रुपये किमतीचा एक व २० हजार रुपये किमतीचा एक मोबाईल व ३० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप काढून घेतला.