फ्लॅट देण्याच्या बहाण्याने पावणे तीन कोटींची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 
पावणे तीन कोटींची फसवणूक
फ्लॅट देण्याच्या बहाण्याने पावणे तीन कोटींची फसवणूक

फ्लॅट देण्याच्या बहाण्याने पावणे तीन कोटींची फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ : फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एकाची पावणे तीन कोटींची फसवणूक केली. हा प्रकार पुणे व निगडी प्राधिकरण येथे घडला. या प्रकरणी सोनीत सोमनाथ परदेशी (रा. सेक्टर क्रमांक २६, प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नरेंद्र रामचंद्र शेंगर (रा. प्राधिकरण निगडी), धर्मा सोनू गोल्हार (वय ३८, रा. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड), एक महिला (रा. बिबवेवाडी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नरेंद्र याने फिर्यादी यांना निगडी प्राधिकरण येथे दोन प्लॉट घेऊन देतो, असे भासवले. त्यासाठी धर्मा व महिला आरोपी यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे दोन कोटी ९० लाख रुपये घेतले. त्यानंतर फ्लॅट न दिल्याने फिर्यादींनी पैशांची वारंवार मागणी केली असता आरोपींनी १३ लाख ५० हजार रुपये परत केले. उर्वरित दोन कोटी ७६ लाख ५० हजार रुपये परत केले नाहीत. फिर्यादी यांनी पैसे परत मागितले. त्यावर पैसे मागितल्यास आम्ही पोलिस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करू, अशी आरोपींनी धमकी दिली. निगडी पोलिस तपास करीत आहेत.


विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल
पहिले लग्न झालेले असतानाही त्याची कोणतीही कल्पना न देता दुसरे लग्न केले. त्यानंतर विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती आशिष सुभाष पवार, सासरा सुभाष तुकाराम पवार व महिला आरोपी व (सर्व रा. नवी सांगवी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या पतीचे पहिले लग्न झालेले असताना देखील त्याने ही माहिती पत्नीसह त्यांच्या कुटूंबियांपासून लपवून ठेवली. त्यानंतर त्याने फिर्यादीशी दुसरे लग्न करून मानसिक त्रास देत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सासू व सासऱ्यांनीही घरकामावरून विवाहितेचा छळ केला. सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सोन्याच्या बांगडीचा अपहार; एकावर गुन्हा
महिलेशी गप्पा मारत असताना तिच्या हातातील सोन्याची बांगडी पाहण्यासाठी मागितली. त्यांनतर महिलेला पिण्यासाठी पाणी आणायला सांगून आरोपी पसार झाला. हा प्रकार वाकड येथे घडला.गणेश घुले (वय ३५, रा. शिवाजी चौक, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गणेश हा फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने फिर्यादींशी गप्पा मारताना त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी पाहण्यासाठी मागितली. दरम्यान त्याने तहान लागली असल्याने पाणी आणण्याची विनंती केली. फिर्यादी महिला किचनमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या असता गणेश घरातून निघून गेला. त्यानंतर महिलेने गणेशला फोन केला. तो पाच मिनिटात परत आलो म्हणाला व त्याने फोन बंद केला. फिर्यादी या गणेशच्या घरी गेल्या असता तो घरी देखील नव्हता. एक लाख ३२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगडीचा अपहार केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

टोळक्याकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
किरकोळ कारणावरून झालेल्या वादात टोळक्याने दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला. याप्रकरणी शिवराज मंगेश जाधव (वय १७ रा. विजयनगर, काळेवाडी) याने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित माटे (वय २२) व त्याच्या सहा साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्याचा मित्र अशितोष बाळासाहेब पांडढवळे हे कॉलेज मधून त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी रोहित व त्याचे साथीदार फिर्यादीजवळ आले. रोहित याने ''इतक्या जोरात गाडी का चालवतोस तुझ्यामुळे माझा भाचा तुझ्या गाडी खाली आला असता असे म्हणत फिर्यादीला हाताने मारहाण केली. यावेळी फिर्यादीचे मित्र नीलेश चव्हाण व साद सय्यद तेथे आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. तसेच तुझा गेमच करतो अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा या भांडणाच्या कारणावरून आरोपीने त्याचे आणखी साथीदार बोलावले. त्यांनतर फिर्यादीसह यांच्या मित्राला दांडक्याने व बांबूने मारहाण केली. यामध्ये फिर्यादीसह अशितोष हे जखमी झाले. पिंपरी
पोलिस अधिक तपास करीत आहेत.