मोबाईल क्रमांक लिंक करा; करात सवलत मिळवा महापालिका प्रशासकांची प्रस्तावास मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल क्रमांक लिंक करा;
करात सवलत मिळवा
महापालिका प्रशासकांची प्रस्तावास मंजुरी
मोबाईल क्रमांक लिंक करा; करात सवलत मिळवा महापालिका प्रशासकांची प्रस्तावास मंजुरी

मोबाईल क्रमांक लिंक करा; करात सवलत मिळवा महापालिका प्रशासकांची प्रस्तावास मंजुरी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागाकडे नोंद असलेल्या मिळकतीशी मिळकतधारकांनी मोबाईल क्रमांक ‘लिंक’ करावा. त्यामुळे विविध योजनांच्या माहितीसह दरवर्षी मिळकतकर बिलाची लिंक उपलब्ध होईल. तसेच कधीही व कुठेही कराचा भरणा करता येईल. शिवाय, मोबाईल क्रमांक लिंक करणाऱ्या मिळकतधारकांना सामान्यकरात तीन टक्के सवलत देण्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.
महापालिकेतर्फे ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी प्रोत्साहनही दिले जात आहे. त्यामुळे ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ऑनलाइन कर भरताना नागरिकांकडून त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला जात आहे. हा क्रमांक मिळकतींना लिंक होत आहे. मोबाईल क्रमांक लिंक झाल्याने मिळकतधारकांना महापालिकेच्या विविध योजनांची माहिती आणि दरवर्षी कराच्या बिलाची मोबाईलवर लिंक येणार आहे. त्यामुळे नागरिकांना कर भरण्यास अधिक सोईचे होणार आहे. जेणेकरून एखादा नागरिक प्रवासात असला तरी तो कर भरू शकेल, असा महापालिकेचा उद्देश आहे.

३१ डिसेंबरपर्यंत मुदत
मोबाईल क्रमांक लिंक न केलेल्या नागरिकांना मालमत्ता कराची बिले, कर भरणा, कर सवलती, नोटीस, आदेश इत्यादी संपर्क करून पोहोच करणे. कर विषयक माहिती, सूचना नागरिकांना प्राप्त होण्यासाठी जे मालमत्ताधारक ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी त्यांच्या मिळकतीला मोबाईल क्रमांक लिंक किंवा अद्ययावत करून थकबाकी व चालू मागणीचे मूळ कराची रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरणा करतील अशा मालमत्ताधारकांना चालू मागणीतील सामान्यकरात तीन टक्के सवलत दिली जाणार आहे.

एकूण मिळकती ः ५ लाख ८८ हजार
मोबाईल लिंक मिळकती ः २ लाख ८० हजार
मोबाईल क्रमांक लिंक नसलेल्या मिळकती ः ३ लाख ८ हजार
महापालिका करसंकलन केंद्र ः १७
---