पिंपरीत मिळेना मंत्र्यांची तारीख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत मिळेना मंत्र्यांची तारीख
पिंपरीत मिळेना मंत्र्यांची तारीख

पिंपरीत मिळेना मंत्र्यांची तारीख

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः तळवडे निघोजे येथे इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा आणि चिखलीत उभारलेल्या तीनशे दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रांच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे शंभर दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. शिवाय, शहर सौंदर्यीकरणासाठी पंधरा चौकात टाकाऊतून टिकाऊ शिल्प उभारले आहेत. मोशीत अग्निशामक उपकेंद्र व ठिकठिकाणी जिजाऊ क्लिनिक साकारले आहेत. या सर्वांच्या उद्‍घाटनासाठी मंत्र्यांच्या तारखा मिळत नसल्याने सर्वच महत्त्वकांक्षी प्रकल्प पडद्याआड आहेत.

महापालिका पदाधिकाऱ्यांची मुदत १३ मार्च रोजी संपली. कोरोना व अन्य कारणांनी निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे नवीन लोकप्रतिनिधी मिळू शकले नाहीत. १४ मार्चपासून प्रशासकीय कारभार सुरू आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कामे सुरू असलेले महत्त्वकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाकडे असून, काही उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. जवळपास आठ प्रकल्पांचे उद्‍घाटन केले जाणार असून, दोन प्रकल्पांच्या भूमिपूजनाचे नियोजन आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात येणार होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचा दौरा सोमवारपर्यंत (ता. २८) लांबला होता. तोही ऐनवेळी रद्द झाला. आता नव्याने तारीख केव्हा मिळते, त्यावर प्रकल्पांचे उद्‍घाटन व भूमीपूजन अवलंबून आहे.

चिखली जलशुद्धीकरण केंद्र
आंद्रा धरणातून १०० व भामा-आसखेड धरणातून १६७ असे २६७ दशलक्ष लिटर पाणी शहराला मिळणार आहे. त्यासाठी इंद्रायणी नदीवर निघोजेजवळ बांध बांधून अशुद्ध पाणी उचलले जाणार आहे. ते चिखलीत उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाणार आहे. त्यानंतर चिखली, मोशी, चऱ्होली परिसरात पुरवले जाणार आहे. सद्यःस्थितीत आंध्रातील १०० दशलक्ष लिटर अशुद्ध पाणी उचलून शुद्ध करून वितरणाची चाचणी झाली आहे.

टाकाऊतून टिकाऊ शिल्प
महापालिकेतर्फे रस्ते व चौकांचे सुशोभीकरण सुरू आहे. त्यासाठी मोठ्या चौकांमध्ये टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले टिकाऊ शिल्प बसविले जात आहेत. यात दिंडी, अश्व, तोफ, रणगाडा, वारकरी अशा शिल्पांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात सतरा शिल्प उभारण्यात येणार आहेत. त्यातील दहा शिल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहेत. सात शिल्पांचे काम पूर्ण झाले असून ते उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

सायन्स पार्क तारांगण
महापालिकेने चिंचवड स्टेशन परिसरात ऑटो क्लस्टरजवळ सायन्स पार्क उभारले आहे. त्याच्या आवारात तारांगण साकारले आहे. त्यामुळे विविध खगोलीय घटना विद्यार्थी व खगोलप्रेमींना अभ्यासता येणार आहेत. सद्यःस्थितीत कापडी तंबूच्या आधारे छोटेसे तारांगण उभारून त्याद्वारे माहिती दिली जात आहे. नवीन तारांगणमुळे सूर्य व चंद्र ग्रहणे, ग्रहांचे निरीक्षण, उल्का वर्षाव अशा घटनांची माहिती मिळणार आहे.

मोशी अग्निशामक उपकेंद्र
चिखली, मोशी, चऱ्होली परिसरात अनेक गृहप्रकल्प उभे राहात आहेत. औद्योगिक परिसर जवळच आहे. मोशी कचरा डेपो आहे. त्यामुळे अधूनमधून आगीच्या घटना घडत असतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोशीमध्ये अग्निशामक केंद्र असावे, अशी अनेक वर्षांची मागणी होती. त्यानुसार पुणे-नाशिक महामार्गालगत मोशी गावठाण चौकाजवळ महापालिकेने अग्निशामक उपकेंद्र उभारले आहे. त्याचे काम दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे.

प्रतीक्षेतील अन्य प्रकल्प
- इंद्रायणी नदीवर तळवडे-निघोजे येथे उभारलेले पंप हाउस
- आकुर्डी प्राधिकरणात २०१४ पासून साकारले जाणारे नाट्यगृह
- घराजवळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठीचे जिजाऊ क्लिनिक
- इंद्रायणीनगर येथील उद्यान व मोशी विरंगुळा केंद्र

भूमिपूजनांची प्रतीक्षा
- अमृत योजनेअंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
- भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जॅकवेल
(प्रकल्पांचे भूमीपूजन व उद्‍घाटनांच्या कार्यक्रमाची रूपरेषा २४ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती.)