
पीएमपीएमएलच्या अतिक्रमणाने व्यापारी त्रस्त
पिंपरी, ता.१ ः निगडी येथील बी. जी. कॉर्नर व्यापारी संकुल समोरच पीएमपीएमएलने अतिक्रमण केले आहे. या गाळ्यांसमोर बस तिकिट बुकिंग, पास वितरण केंद्रची केबिन थाटली आहे. केबिनच्या आकारामुळे ७२ व्यापारी गाळे झाकले आहेत. साहजिकच त्यांच्या दररोजच्या व्यवसायावर परिणाम होवुन मोठा आर्थिक फटका बसत आहे.
दोन पास केंद्र कशासाठी?
निगडी बस थांबा जाग्यावर पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांनी भलेमोठे अनधिकृत कार्यालय सुरू केले आहे. मात्र याची गरज नाही. दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात यावे. तसेच निगडी बस थांबा हा भक्ती शक्ती उद्यान समोरील अण्णाभाऊ साठे बस थांबा याठिकाणी हलविण्यात आला आहे. निगडी बस थांबा ही तात्पुरता असून त्या ठिकाणी दोन पास केंद्र कशासाठी? असा प्रश्न व्यापारी व नागरिकांचा आहे.
कर्मचाऱ्यांची दमदाटी
याठिकाणी महापालिकेची केबिनसाठी नियोजित जागा आहे. तरीही त्या जागेवर इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. मग नियोजित जागा कशासाठी वापरणार आहेत, असा प्रश्न व्यापारी करत आहेत. केबिनला व्यापाऱ्यांनी विरोध केल्यावर पी.एम.पी.एम.एल.चे अधिकारी नाहक त्रास देतात. व्यावसायिक गाळ्यांचा नियमित कर भरून देखील आम्हाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही केबिन दुसरीकडे हलवावी, अशी विनंती करूनही अधिकारी ऐकत नाहीत. अरेरावीची भाषा वापरतात. तसेच सोसायटी परिसरामध्ये देखील अनधिकृत टपऱ्यांची संख्या जास्त आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
बस थांबा पाठीमागे हलविण्यात यावा
भोसरी बस थांबा याठिकाणी दोन्ही बाजूला लोखंडी शेड बांधलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना तासतासभर रस्त्यावर उभे रहावे लागते. बस थांब्यासमोर रिक्षा उभ्या असल्याने वाहतूक कोंडी होते. भोसरी बस थांबा निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली पार्किंगमध्ये बीआरटी बस थांबा पाठीमागे हलविण्यात यावा, अशी मागणी निगडीतील नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. निगडी बस थांबा चारही बाजूने टपरीधारकांनी अतिक्रमण करून वेढलेला आहे. त्यावर महापालिका प्रशासन कारवाई करत नाही. आराम बस, अवैध प्रवासी वाहतूक रिक्षा रस्त्यावर उभ्या करत असल्याने वाहतूक कोंडी होते. यावरही पोलिस कारवाई करत नाहीत, असा आरोप व्यापारी सचिन काळभोर यांनी केला आहे.
आकडे बोलतात
-जुना बस थांबा- १९९२ सालापासून
-गाळेधारक -७२
-दरमहा मिळकत कर- ७ हजार
-दररोजची ग्राहक संख्या- २ हजार
-पास केंद्र - २
-