राष्ट्रवादीकडून प्रकल्प ‘विसर्जित’ करण्याचे कारस्थान : भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीकडून  प्रकल्प ‘विसर्जित’ करण्याचे कारस्थान : भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांचा आरोप
राष्ट्रवादीकडून प्रकल्प ‘विसर्जित’ करण्याचे कारस्थान : भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांचा आरोप

राष्ट्रवादीकडून प्रकल्प ‘विसर्जित’ करण्याचे कारस्थान : भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांचा आरोप

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ : पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काचे पाणी अडवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी रक्ताचे पाट वाहिले. तरीही शहराला एक थेंब पाणी मिळाले नाही. आता भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी मिळवण्यासाठी सुरू होणाऱ्या ‘जॅकेवेल’च्या कामाला खोडा घालण्याचे पाप राष्ट्रवादी करीत आहे. गैरव्यवहाराचा आरोप करीत भाजपच्या नेत्यांना बदनाम करण्याचा घाट घातला जात आहे. या कामात गैरव्यवहार झाला असेल किंवा भाजप नेत्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध करावे, तर राजकारणातून संन्यास घेईल, असे आव्हान भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी दिले आहे.
महापालिकेच्यावतीने भामा आसखेड धरणातून पाणी मिळवण्यासाठी ‘जॅकवेल’ उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना घेराओ घातला. तसेच, या प्रकरणात भाजपच्या नेत्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. याला एकनाथ पवार यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
एकनाथ पवार म्हणाले की, जॅकवेलच्या कामाची निविदा २०२१ मध्ये प्रसिद्ध झाली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून दोनदा मुदतवाढ देण्यात आली. दोन कंपन्यांनी निविदा भरली. त्यातील एक अपात्र झाली. निविदा स्वीकृती रकमेपेक्षा जास्त दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदार कंपनीला प्रशासनाने दोनवेळा पत्र पाठवून दर कमी करण्याबाबत सूचना केली. त्यानुसार कंपनीने १७ कोटी रुपये कमी करण्याची भूमिका घेतली. प्रशासनाने पिंपरी-चिंचवडकरांच्या करातून खर्च होणारे १७ कोटी रुपये वाचवले. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रशासनाचे अभिनंदन करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे न करता निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी करीत प्रकल्पाला खोडा घालून पिंपरी-चिंचवडकरांचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वास्तविक, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात आणि स्वत:च्या मर्जीतील आयुक्त असताना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना शहर विकासाच्या दृष्टीने एकाही मोठा प्रकल्प राबवता आला नाही. याउलट, भाजपच्या काळात राबवलेल्या प्रकल्पांचा निधी कमी करणे, अशी कारस्थाने केली. आता सेना-भाजप महायुतीची सत्ता राज्यात आहे. त्यांच्या मदतीने लोकांच्या अपेक्षांचा विचार करून आणि महाविकास आघाडीच्या काळातील रखडलेले सकारात्मक प्रकल्प मार्गी लागत आहेत. याचा राष्ट्रवादीला पोटशूळ उठला असावा, अशी टीकाही पवार यांनी केली.

अपात्र ठेकेदारासाठी जळफळाट?
‘जॅकवेल’च्या कामात दोन कंपन्यांनी निविदा भरली. त्यातील पात्र ठरलेल्या निविदाधारक कंपनीला महाविकास आघाडीच्या काळात मुंबई आणि पुणे येथील शेकडो कोटी रुपयांची कामे दिल्याचे निदर्शनास आले आहेत. संबंधित कंपनीवर आक्षेप घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना दुसऱ्या कंपनीला काम मिळावे, अशी अपेक्षा होती. अपेक्षाभंग झाल्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना निविदा राबविल्यानंतर तीन महिन्यांनी जाग आली, असा आरोपही एकनाथ पवार यांनी केला आहे.